PMC Election 2026: ‘ग्लोबल सिटी’चे स्वप्न, पण झोपडपट्टी आणि स्मार्ट सिटी गायब; भाजपच्या संकल्पपत्रावर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:29 IST2026-01-08T09:27:49+5:302026-01-08T09:29:04+5:30
पुण्याच्या विकासाचे संकल्प पत्र तयार केले असून या संकल्प पत्राचे प्रकाशन बुधवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

PMC Election 2026: ‘ग्लोबल सिटी’चे स्वप्न, पण झोपडपट्टी आणि स्मार्ट सिटी गायब; भाजपच्या संकल्पपत्रावर प्रश्नचिन्ह
पुणे : भाजपने महापालिका निवडणुकीसाठी पुण्याच्या विकासाचे संकल्प पत्र तयार केले असून या संकल्प पत्राचे प्रकाशन बुधवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
भाजपच्या माध्यम सेंटरमध्ये झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, भीमराव तापकीर, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, रवींद्र साळेगावकर उपस्थित होते.
भाजपच्या या संकल्प पत्रामध्ये काही नवीन प्रकल्पांसह महापालिकेच्या वतीने हाती घेतलेल्या अनेक प्रकल्पांचा उल्लेख आहे. संकल्प पत्रामध्ये कुठेही शहरातील झोपडपट्टीवासीयांसाठी काय करणार किंवा झोपडपट्टी निर्मूलनासाठी नियोजन काय, यांसह स्मार्टसिटीचा उल्लेखही नाही. मागील महापालिका निवडणुकीत ‘आपलं पुणे, स्मार्ट पुणे’ अशी टॅगलाईन भाजपने वापरली होती. परंतु स्मार्ट सिटी कंपनीचा गाशा गुंडाळला आहे. याकडे मुरलीधर मोहोळ यांचे लक्ष वेधले असता त्यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत औंध, बाणेर, बालेवाडी परिसरात विकासकामे आणि सुविधा निर्माण करण्यात आल्या, असे मोघम उत्तर दिले तसेच शनिवार वाड्याच्या परिसरातून भुयारी मेट्रोला परवानगी मिळाली नाही, मग या परिसरातून भुयारी मार्ग कसा करणार, या प्रश्नावरही त्यांनी स्पष्टीकरण देणे टाळले.
झोपडपट्टीवासीयांना 'कात्रजचा घाट’
शहरात चाळीस टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. असे असताना शहराच्या या घटकच भाजपच्या संकल्पपत्रातून गायब आहे. ‘ग्लोबल सिटी’ चे स्वप्न दाखवणाऱ्या भाजपने झोपडपट्टीवासीयांना हद्दपार केल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर मोहोळ यांनी पंतप्रधान आवास योजनेत त्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे उत्तर दिले.
भाजपच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ, करदाते, आरोग्य, वाहतूक, गृहनिर्माण, सांस्कृतिक व आर्थिक विकास यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. पुणे शहराला ‘वर्ल्ड बुक कॅपिटल’ बनविणे, अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर उभारणे, ‘एम्स’ रुग्णालय आणणे, नवीन मेट्रो मार्ग, डेटा सेंटर विकास आदी महत्त्वाकांक्षी संकल्पनांचा समावेश आहे. - मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री.