PMC Election 2026: शिंदेसेनेने पक्षाचा अधिकृत ‘एबी’ फॉर्म दिला अन् तो गायब झाला; शेवटपर्यंत परतलाच नाही, पुण्यातील अजब प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:18 IST2026-01-01T11:17:38+5:302026-01-01T11:18:14+5:30
PMC Election 2026 एका उमेदवाराला स्थानिक नेत्यांनी ‘एबी’ फॉर्म दिल्यावर तो कार्यालयातून बाहेर पडला आणि पुन्हा अर्ज भरण्याची वेळ संपेपर्यंत आलाच नाही. परिणामी, या प्रभागात शिवसेनेचे पॅनल अपूर्ण राहिले आहे.

PMC Election 2026: शिंदेसेनेने पक्षाचा अधिकृत ‘एबी’ फॉर्म दिला अन् तो गायब झाला; शेवटपर्यंत परतलाच नाही, पुण्यातील अजब प्रकार
पुणे: निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी राजकीय पक्ष उमेदवारांच्या मागे लागतात, पण पुण्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदेसेनेवर मोठी नामुष्की ओढवली. पक्षाने अधिकृत उमेदवारीचा ‘एबी’ फॉर्म एका उमेदवाराच्या हातात दिला, मात्र तो उमेदवार फॉर्म घेऊन गायब झाला तो थेट अर्ज भरण्याची वेळ संपेपर्यंत परतलाच नाही.
महायुती तुटल्यानंतर शिंदेसेनेने प्रभाग ३३ मध्ये तातडीने उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारातच ‘एबी’ फॉर्म वाटप करण्यात येत होते. याच गोंधळात एका उमेदवाराला स्थानिक नेत्यांनी ‘एबी’ फॉर्म दिला. परंतु, तो उमेदवार ‘एबी’ फॉर्म घेऊन कार्यालयातून बाहेर पडला आणि पुन्हा अर्ज भरण्याची वेळ संपेपर्यंत आलाच नाही. परिणामी, या प्रभागात शिवसेनेचे पॅनल अपूर्ण राहिले आहे.
दुसरीकडे, प्रभाग ३४ मध्ये निलेश गिरमे आणि त्यांच्या मातोश्री राधिका गिरमे या माय-लेकांना एकाच वेळी उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारांची वानवा असल्यानेच पक्षाने एकाच कुटुंबात दोन तिकिटे दिली का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रभाग क्रमांक ३३ मध्ये भाजपने नाकारलेल्या संदीप सुभाष पोकळे व सीमा पोकळे या पती-पत्नीला एकाच प्रभागातून शिंदे गटाने तातडीने उमेदवारी दिली आहे.