PMC Election 2026: कसबा-विश्रामबागमधील प्रभागांमध्ये मतदानाबाबत समाधानकारक चित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 18:54 IST2026-01-15T18:53:33+5:302026-01-15T18:54:08+5:30
काही ठिकाणी इव्हीएम मशीन बंद पडणे, स्लिपचे वाटप न झाल्यामुळे ज्येष्ठांना अडचणी येणे, प्रभाग बदलल्यामुळे मतदारांची गैरसोय होण्याचे प्रकार समोर आले.

PMC Election 2026: कसबा-विश्रामबागमधील प्रभागांमध्ये मतदानाबाबत समाधानकारक चित्र
पुणे : कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या २५, २७ व २८ या तिन्ही प्रभागांत मतदानाबाबत गुरुवारी समाधानकारक चित्र दिसले. सकाळी मतदान केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. दुपारी १२ नंतर मतदानाचा ओघ वाढला, तो सायंकाळपर्यंत कायम राहिला. तिन्ही प्रभाग मिळून ३:३० वाजेपर्यंत ३८.४७ टक्के मतदान झाले.
काही ठिकाणी इव्हीएम मशीन बंद पडणे, स्लिपचे वाटप न झाल्यामुळे ज्येष्ठांना अडचणी येणे, प्रभाग बदलल्यामुळे मतदारांची गैरसोय होण्याचे प्रकार समोर आले. मतदारांच्या बोटाला लावलेली शाई पुसली जाण्याची चर्चा सुरू झाल्यामुळे मतदार केंद्रांवर जाऊन कार्यकर्ते व उमेदवार चर्चेची खातरजमा करताना दिसत होते.
प्रभाग २५ मध्ये शनिवार पेठ, मंडई, २७ मध्ये नवी पेठ-पर्वती आणि २८ मध्ये जनता वसाहत- हिंगणे खुर्द हा भाग येतो. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर मतदान केले, त्या मतदान केंद्रावरील यादीत नावच नसल्याने आणि घरोघरी स्लिपांचे वाटपच न झाल्याने ज्येष्ठ मतदारांचे काहीसे हाल झाले.
दुसऱ्याच प्रभागात नाव गेल्याने मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना धडपड करावी लागली. विधानसभा निवडणुकीत घरबसल्या ज्येष्ठांना मतदान करण्याची सोय होती. मात्र, यंदा तशी सुविधा देण्यात न आल्याने ८० वर्षांपुढील ज्येष्ठांना त्यांची मुले मतदानासाठी केंद्रावर घेऊन येताना दिसत होते. सकाळच्या वेळेस रेणुका स्वरूप प्रशाला आणि पुणे विद्यार्थी गृह मतदान केंद्रावर थोड्यावेळ मशीन बंद पडण्याचा प्रकार घडला. परंतु, लगेच तांत्रिक दुरुस्ती करून मशीन पुन्हा सुरू करण्यात आली. जनता वसाहतमध्ये पाऊण तास मशीन बंद पडल्याने ज्येष्ठांना मतदान केंद्रावर ताटकळत थांबावे लागले. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, जनता वसाहतमधील सांस्कृतिक हाॅल मतदान केंद्रावर मशीनचे बटण नादुरुस्त झाल्याने एक सीयू बदलण्यात आले. दरम्यान, सकाळी मतदान केंद्रावर केवळ ५ ते ७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. दुपारी बारानंतर मतदानाचा ओघ वाढला. घरातील कामे संपवून महिलावर्ग मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडला होता. केंद्रांवर रांगा असल्याने ५:३० पर्यंत रांगेत असणाऱ्या शेवटच्या मतदान होईपर्यंत प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली.