PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात; ४ हजार ११ मतदान केंद्र, १३ हजार ८६२ मतदान यंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 21:05 IST2026-01-08T21:00:02+5:302026-01-08T21:05:01+5:30
PMC Election 2026 पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा असून ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत.

PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात; ४ हजार ११ मतदान केंद्र, १३ हजार ८६२ मतदान यंत्र
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सहा दिवसांचा कालावधी राहिला आहे. यासाठी पालिका प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केली असून, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणुकीसाठी ४ हजार ११ मतदान केंद्र आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे १७४ मतदान केंद्र प्रभाग क्र. ९ बाणेर - बालेवाडी - पाषाण येथे, तर प्रभाग क्र. ३९ अपर सुपर इंदिरानगरमध्ये सर्वांत कमी म्हणजे ६८ मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीची मतमोजणी १६ जानेवारी रोजी १५ ठिकाणी होणार आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. प्रभाग क्रमांक ३५मधील भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता निवडणूक १६३ जागांसाठी होत आहे. या निवडणुकीसाठी २३ हजार ५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ४ हजार ०११ मतदान केंद्र आहेत. १३ हजार ८६२ मतदान यंत्र (बॅलेट युनिट), तर ५ हजार ३२१ कंट्रोल युनिट आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदार अधिकारी, १ शिपाई असेल. ४ हजार ११ मतदान केंद्राकरिता ६ हजार ५०० साहित्याचे किट तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. या निवडणुकीसाठी १ हजार ५१ वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात पीएमपीएमएल बसेसचा समावेश आहे.
निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदान
पुणे महापालिका निवडणुकीत निवडणूक कर्मचारी असणाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सोय केली आहे. ही प्रक्रिया सुरू आहे.
...असे राेखणार दुबार मतदान
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दुबार मतदारांची नावे तब्बल ३ लाख ४४६ आहे. दुबार मतदारांच्या यादीनुसार पालिकेचेे कर्मचारी संबंधित मतदारांच्या घरी जाऊन तो मतदार इथे मतदान करणार असेल तर अर्ज भरून घेत आहेत. त्या मतदाराचे नाव दुसऱ्या ठिकाणी असल्यास तेथे मतदान केले म्हणून शिक्का मारला जाणार आहे.
मतदान यंत्रे सील करण्यास सुरुवात
पुणे महापालिका निवडणुकीसाठी १३ हजार ५०० मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आहेत. त्यापैकी काही मतदानयंत्रांमध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर मतपत्रिका सील करण्यास काही ठिकाणी सुरुवात झाली आहे.
मतमोजणी होणार या १५ ठिकाणी
सारसबागेशेजारील, कै. बाबुराव सणस क्रीडांगण, वडगाव बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार अकॅडमी ऑफ ए लर्निंग स्कूल, टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल, धनकवडी - सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रांगणातील बंदिस्त पत्रा शेड, शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय मैदान, कात्रजमधील गोकुळनगर हेमी पार्कजवळील छत्रपती संभाजी महाराज ई लर्निंग स्कूल, वानवडीतील जिजाऊ मंगल कार्यालय, हडपसरमधील माळवाडी येथील साधना विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे कर्मवीर सभागृह, खराडी येथील कै. राजाराम भिकू पठारे, बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलमधील बॅडमिटंन हॉल, कोथरूडमधील एमआयटीमधील द्रोणाचार्य बिल्डिंग पहिला मजला, भवानी पेठेतील रफी अहमद किदवाई उर्दु माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालय, पौडफाटा येथील पंडित दिनदयाळ उपाध्याय इंग्रजी शाळा, कोरेगाव पार्कमधील मौलाना अब्दुल कलाम स्मारक, नगररोड - वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय.
एकूण मतदार संख्या ३५ लाख ५१ हजार ८५४
पुरुष : १८ लाख ३२ हजार ४४९
महिला : १७ लाख १९ हजार १७
इतर : ४८८
अनुसूचित जातीची लोकसंख्या : ४ लाख ६८ हजार ६३३
अनुसूचित जमातीची लोकसंख्या : ४० हजार ६८७
दुबार मतदार नावे ३ लाख ४४६