PMC Election 2026: पुण्यात कुठंही युती तुटली नाही; फक्त एबी फॉर्म दिले आहेत, उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:26 IST2025-12-30T15:24:37+5:302025-12-30T15:26:00+5:30
PMC Election 2026 पक्षाचे कार्यकर्ते भावनिक झाले आहेत, भावनिक लोकांना समजावणे आमची जबाबदारी आहे.

PMC Election 2026: पुण्यात कुठंही युती तुटली नाही; फक्त एबी फॉर्म दिले आहेत, उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना यांची युती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. भाजपकडून "सन्मानपूर्वक" जागा न मिळाल्यामुळे शिंदेसेना नाराज आहे. भाजपकडून १५ अधिक १ म्हणजेच १६ जागांचा प्रस्ताव शिंदेसेनेपुढे ठेवला आहे. मात्र, शिंदेसेना २५ जागांवर ठाम आहे. भाजपकडून शिंदेसेनेला जागा वाटपाबाबत उत्तरे मिळाली नसल्यामुळे शिंदेसेनेची आज बैठक पार पडली. या बैठकीत दोघांची युती तुटल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात जागावाटपावरून गेले अनेक दिवस सुरू असलेला तिढा सुटण्याऐवजी आता थेट युतीच तुटल्याची माहिती समोर आली. पुण्यात शिवसेना आता स्वबळावर निवडणूक लढवणार असून, तब्बल १६५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुण्यात आणि महाराष्ट्रात कुठेही युती तुटली नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मी शिवसेना पक्षाच्या वतीने आलो आहे. आम्ही मुंबई मध्ये एकत्रित लढत आहोत. काल विरोधकांचा भ्रमनिरास झाला. मनसे - शिवसेना उद्धव ठाकरे युती मुळे पहिले काय झाले, त्याची प्रचिती मुंबईमध्ये आलेली आहे. सगळ्या निवडणुका महत्वाच्या आहेत. महायुती मुंबई महापालिकेवर भगवा फडकला जाणार आहे. कुठल्याही महापालिकेमध्ये युती तुटली नाही. पुण्यात एबी फॉर्म दिले आहेत. महायुती तुटली असे चित्र कुठेही नाही.
सगळीकडे झालेले गैरसमज आम्ही दूर करू. आजपासून बोलायला तीन चार दिवस आहेत. कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेऊ नये. माझे पुण्यातील भाजप नेत्यांशी बोलणे झाले आहे. नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे याच्यासोबत आम्ही एकत्रित बैठक घेणार आहोत. जागा वाटपाबाबत चर्चा सकारात्मक होईल. कार्यकर्ते भावनिक झाले आहेत. आमचा नगरपालिका निवडणुकीत दोन नंबरचा पक्ष आहे. भावनिक लोकांना समजावणे आमची जबाबदारी आहे. आर पी आय भाजप सोबत आहेत. आनंदराज आंबेडकर यांना विश्वासात घेऊन जागा देऊ. सगळ्यात पैसे व्यवहार करून आम्ही तिकिट देत नाही. आमचे कार्यकर्ते असे नाहीत. जागेबाबत चढाओढ असल्याने युती तुटली असे म्हणणे चुकीचे आहे. आमचे पदाधिकारी अजित दादांना जाऊन भेटले असतील पण युती नाही केली.