PMC Election 2026: नवमतदार पहिलांदाच बजावणार आपला मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:10 IST2026-01-14T14:59:13+5:302026-01-14T15:10:15+5:30
तरुण मतदारांमध्ये या प्रक्रियेचा भाग असल्याचा अभिमान आणि जबाबदारीची जाणीव प्रकर्षाने जाणवते.

PMC Election 2026: नवमतदार पहिलांदाच बजावणार आपला मतदानाचा हक्क
पुणे : जीवनात पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज असलेल्या नवमतदारांच्या मनात मतदानाविषयी उत्सुकता, संभ्रम अन् चिंतन अशा संमिश्र भावना दाटून आलेल्या दिसतात. काही मतदारांमध्ये राजकीय प्रक्रियेबद्दल उदासीनता दिसून येत असली, तरीही लोकशाहीची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवण्याची इच्छा या युवकांना आहे.
तरुण मतदारांमध्ये या प्रक्रियेचा भाग असल्याचा अभिमान आणि जबाबदारीची जाणीव प्रकर्षाने जाणवते. जात, धर्म किंवा पक्षीय ओळखींपेक्षा स्थानिक प्रश्नांची जाण असलेला, प्रामाणिकपणे विकासासाठी काम करणारा उमेदवार निवडण्याचा निर्धार ते व्यक्त करत आहेत. ‘एका मताने काय फरक पडणार?’ असा प्रश्न उपस्थित होत असला, तरी योग्य उमेदवाराला दिलेले एक मतही बदलाची नांदी ठरू शकते, ही जाणीव नवमतदारांना मतदानाकडे प्रवृत्त करत आहे.
कोण उमेदवार आहेत, काहीच माहिती नाही. नुसता गोंधळ आहे. नोटा दाबून येणार आहे. कोणाविषयीच काही वाटत नाही, पण प्रक्रिया पाहण्याची इच्छा आहे. - शिवहार शेटे
उमेदवार कोण, कोणते चिन्ह, काय त्यांचे धोरण काहीच कळत नाहीये आणि त्यात तथ्यं पण वाटत नाही. रोज पक्षांचे गट तयार होत आहेत. - महेश डहाळे
पहिलं मतदान आहे खूप उत्सुकता आहे. इतके दिवस या प्रक्रियेचा भाग नव्हतो पण आता या प्रक्रियेचा भाग आहे, याचा अभिमान वाटतोय. विकासकामांसाठी याकडे जागरूकतेने लक्ष देणं गरजेचे आहे. - आनंद नाटकर
कोणत्याही जात, धर्म, पक्षाचा उमेदवार असेल तरी तो स्थानिक समस्यांकडे कसा पाहतो, किती सजगतेने प्रश्न सोडवतो? अशाच उमेदवाराला मी मत देणार. हक्क आहे, तो बजावणारच. - मयूरी तिडके
मतदानासाठी उत्सुक आहे. सगळी प्रक्रिया नीट पाहणार. कसे असते ते तरी पाहुया असे मला वाटते. - नरहरी शहाणे
माझं पहिलं मतदान आहे. युवा मतदारांनी शहरासाठी आवाज उठवायला हवा. ‘फ्युचर आमचं आहे, म्हणून निर्णयही आमचाच महत्त्वाचा’ असा आमचा विचार आहे. - योगेश चव्हाण
मतदानाचा दिवस म्हणजे लोकशाहीचा सण आणि या सणात पहिल्यांदा सहभागी होताना मी खूपच उत्सुक आहे. - आदित्य वाळके
मतदान म्हणजे फक्त फोटो काढून पोस्ट करणं नाही; हा लोकशाहीवरचा विश्वास व्यक्त करणं आहे. - संदेश पवार
रोजगाराच्या प्रश्नाला कोणत्या पक्षाने, उमेदवाराने प्राधान्य दिले आहे ते मी पाहतो आहे. आमच्यासाठी संधी महत्त्वाच्या आहेत. - योगिता साने
सोशल मीडियावर अनेक मतं असतात, पण मतदान केंद्रात निर्णय पूर्णपणे स्वतःचा असतो. - राहुल कामठे
मी निवडणुकीकडे नेहमी बाहेरून पाहत होतो, पण आज त्या प्रक्रियेचा मी प्रत्यक्ष भाग बनत आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. - प्रतीक कणसे
कोण चांगलं बोलतं यापेक्षा कोण काम करतं हे महत्त्वाचं आहे. मी काम पाहून मत देणार. - करण पाटील
मी प्रचारातल्या घोषणा नाही तर माझ्या भागातील समस्यांवर उपाय करणाऱ्याला मत देणार. - सर्वेश कांबळे
माझ्या भागातले रस्ते, पाणी, कॉलेज बस सेवा—या समस्या पाहता मी मुद्द्यांनुसार मत देणार. - प्रतीक्षा वागसे
राजकीय भाषणांपेक्षा मला उमेदवारांचे खरे काम आणि स्वच्छ प्रतिमा महत्त्वाची वाटते. - प्रतीक शिंदे