PMC Election 2026: नाव एका ठिकाणी, मतदान दुसरीकडे..! पुण्यातील कसबा पेठेतील मतदाराची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 18:14 IST2026-01-15T18:12:47+5:302026-01-15T18:14:34+5:30
- पुणे–पिंपरीत मतदानाची टक्केवारी वाढीच्या दिशेने; दुपारनंतर मतदारांचा उत्साह

PMC Election 2026: नाव एका ठिकाणी, मतदान दुसरीकडे..! पुण्यातील कसबा पेठेतील मतदाराची संतप्त प्रतिक्रिया
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मतदानाचा उत्साह हळूहळू वाढताना दिसून आला. सकाळच्या वेळेत मतदानाचा वेग कमी असला तरी दुपारनंतर मतदार केंद्रांवर रांगा वाढल्या. पहिल्या टप्प्यात सकाळी पहिल्या दोन तासांत पुण्यात सरासरी ५.५ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ७ टक्के मतदान नोंदवले गेले. दुसऱ्या टप्प्यात सकाळी ११.३० वाजेपर्यंत पुण्यात मतदानाची टक्केवारी १२ टक्क्यांवर, तर पिंपरी-चिंचवडमध्ये १६.०३ टक्क्यांपर्यंत पोहोचली.
तिसऱ्या टप्प्यात दुपारी १.३० वाजेपर्यंत पुण्यात २६.२८ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये २८.१५ टक्के मतदान झाले. दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात पुण्यात एकूण ३९ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
मतदान प्रक्रियेत तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटकांचा सहभाग दिसून आला. अनेक ज्येष्ठ नागरिक रिक्षा, खासगी वाहनांच्या सहाय्याने मतदान केंद्रांवर पोहोचताना दिसले. काही ठिकाणी मतदार यादीतील बदल आणि मतदान केंद्र बदलल्यामुळे नागरिकांचा गोंधळ झाला.
कसबा पेठेतील मतदार प्रविणी नाईक यांनी सांगितले, “मतदान केंद्र दुसऱ्या परिसरात हलवण्यात आल्यामुळे मोठा गोंधळ झाला. नाव कसबा पेठेत होते, पण मतदान दुसरीकडे. जवळपास अर्धा दिवस शोधण्यात गेला. मी १८ वर्षांपासून मतदान करते, पण असा अनुभव पहिल्यांदाच आला.” प्रशासनाकडून मतदारांना मतदान केंद्राची माहिती वेळेवर देण्याची गरज असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.
तर प्रियंका गायकवाड यांनी सांगितले, 'यंदा प्रथमच मतदानाचे केंद्र अचानक बदलल्यामुळे खूप मोठा गोंधळ उडाला आणि त्यामुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. इतकी वर्षे एकाच ठिकाणी मतदान केल्यानंतर असा बदल होणे अनपेक्षित होते. प्रशासनाने नियोजनात सुधारणा करणे गरजेचे आहे. घरातील काहींचे मतदान दुसऱ्या मतदान केंद्रावर तर काहींचे दुसऱ्या ठिकाणी यामुळे नाहक वेळ देखील गेला.