PMC Election 2026: पुण्यात दुपारी १ ते ४ दरम्यान मतदानापेक्षा वामकुक्षीला प्राधान्य; मतदान केंद्रातील कर्मचारीही निवांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 20:26 IST2026-01-15T20:26:37+5:302026-01-15T20:26:48+5:30
- सकाळी १० च्या आधी, दुपारी ४ च्या नंतर वाढला ओघ

PMC Election 2026: पुण्यात दुपारी १ ते ४ दरम्यान मतदानापेक्षा वामकुक्षीला प्राधान्य; मतदान केंद्रातील कर्मचारीही निवांत
पुणे: सर्वसामान्य नोकरदार, वृद्ध, कुटुंबासमवेत मतदान करणारे अशांनी सकाळी १० च्या आत आपले मतदान उरकून घेतले. एकेकटे मतदान करणारे, उमेदवारांची किंवा त्याच्या कार्यकर्त्यांच्या भेटीची वाट पाहणारे अशांनी दुपारी ४ नंतर जोरदार गर्दी करत मतदान केंद्रात धुरळा उडवून दिला. पुण्याच्या पूर्व भागातील पेठांमधल्या बहुसंख्य मतदान केंद्रांवरचे मतदानाचे सर्वसाधारण चित्र असे नेहमीसारखेच होते.
रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार तसेच बुधवारही त्याचबरोबर नारायण, सदाशिव, नाना, भवानी या पेठांमध्ये उमेदवारांचे कार्यकर्ते बूथ टाकून बसले होते. १०० मीटरच्या बाहेर बूथ वगैरे रचना बुधवारी रात्रीच करून झाली होती. सकाळी मतदान सुरू होताच १० वाजेपर्यंत सोसायट्यांमधील नोकरदार नवमध्यमवर्गीय यांनी कुटुंबासहित मतदान केंद्रावर येऊन मतदार करून घेतले. तोच प्रकार वाड्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांमध्येही झाला. बूथवर विचारणा नाही, कोणी कार्यकर्ता बरोबर नाही, स्लीप हातात घेऊन थेट मतदान केंद्रात व तिथून मतदान कक्षामध्ये. मतदान करण्यासाठी हा वर्ग आला कधी व मतदान करून गेला कधी याचा पत्ताही उमेदवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी लागला नाही. त्यानंतर मग कार्यकर्ते, त्यांचे कुटुंबीय अशांची तुरळक गर्दी झाली.
दुपारी ११ नंतर बहुसंख्य मतदान केंद्रांवरची गर्दी ओसरली होती. उमेदवारांच्या बूथवरचे कार्यकर्तेही चहा, नाष्टा करण्यात गुंतले होते. यावेळी मतदान केंद्रांवर महिला कार्यकर्त्यांचीही संख्या लक्षणीय दिसत होती. मतदाराने स्लीप दाखवून विचारणा केली की, या महिला कार्यकर्त्यांची, त्यांची नावे शोधताना तारांबळ उडत होती. त्यानंतर कार्यकर्ते येऊन त्यांना मदत करत होते. मात्र, अनेक ठिकाणी मतदान केंद्र बदललेली, काही ठिकाणी एकाच घरातील नावे वेगवेगळ्या क्रमांकावर गेलेली असे प्रकार दिसत होते. जमेल तसे मार्गदर्शन करून कार्यकर्ते ते निस्तरत होते.
दुपारी ४ पर्यंतचे चित्र असेच होते. त्यातही भवानी पेठेतील लोहिया नगर, घोरपडी पेठ, टिंबर मार्केट, घसेटी पूल, खडकमाळ आळी, मोमिनपुरा, मासेआळी, या ठिकाणी रस्त्यांवरून उमेदवारांचे प्रमुख कार्यकर्ते गाड्यांमधून ये-जा करताना दिसत होते. त्यानंतर पेठांमधील गल्लीबोळात फिरताना अचानक मतदारांची गर्दी दिसायला लागली. जवळपास प्रत्येक घरातून मतदान बाहेर येताना दिसत होते. तीच गर्दी मग मतदान केंद्रांवरही दिसू लागली. तोपर्यंत निवांत बसलेले मतदान केंद्रांमधील अधिकारी खडबडून जागे झाले व मतदान प्रक्रिया गतीने सुरू झाली.