PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 18:17 IST2025-12-30T18:15:43+5:302025-12-30T18:17:37+5:30
Pune Municipal Election 2026: पुणे महापालिकेच्या निवडणुकीत कुख्यात गुंड बंडू आंदेरकरच्या घरातील तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे सध्या तुरुंगात असलेल्या त्याच्या कुटुंबातील दोघांनी अजित पवारांकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
Pune Municipal election 2026 Ajit Pawar: हत्या प्रकरणातील कुख्यात गुंड बंडू आंदेकरने पुणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्याच्या कुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनीही अर्ज दाखल केला होता. त्यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार, याबद्दल उत्सुकता होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ती बाब समोर आली. अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसकडून दोघींच्या उमेदवारीबद्दल गुप्तता पाळण्यात आली होती. पण, वकील आला आणि त्याने एबी फॉर्म दिला. त्यानंतर बातमी फुटली.
आयुष कोमकर हत्या प्रकरणातील बंडू आंदेकर, खंडणी प्रकरणातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हे तिघे तुरूंगात आहेत. त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक २३ मधून दोघींनी अर्ज दाखल केला. विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात जाऊन तिघांनी उमेदवारी अर्ज भरला होता.
गुन्हेगारीमुळे गुप्तता पाळली, पण...
बंडू आंदेकरसह लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर या तिघांना न्यायालयाने सशर्त अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली होती. २७ डिसेंबर रोजी तिघांनी अर्ज भरला. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या उमेदवारीबद्दल गोपनीयता बाळगण्यात आली होती.
मंगळवारी (३० डिसेंबर) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आंदेकरांचे वकील आले आणि त्यांनी एबी फॉर्म दाखल केले. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून उमेदवारी देण्यात आल्याचे समोर आले.
बंडू आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे. तर सोनाली आणि लक्ष्मी यांच्याविरोधात ५ कोटी ४० लाख खंडणीचा गुन्हा आहे. तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
गजा मारणेच्या पत्नीलाही उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे हिलाही उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तीन गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) वादात सापडण्याची चिन्हे आहेत.