PMC Election 2026: मतदान केंद्रांवर सुविधांची वानवा; मनपाची यंत्रणा फेल; पुण्यात कुठे काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 21:50 IST2026-01-15T21:45:02+5:302026-01-15T21:50:02+5:30
-मतदार केंद्र एकीकडे आणि बूथ भलतीकडेच यातील अंतरात मोठी तफावत असल्याने बूथवर जाऊन मतदान चिठ्ठी घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना रस्ते ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागली.

PMC Election 2026: मतदान केंद्रांवर सुविधांची वानवा; मनपाची यंत्रणा फेल; पुण्यात कुठे काय घडले?
- संजय चिंचोले
पुणे : नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांत मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा पुणे महापालिका कारभाऱ्यांना विसर पडल्याने मतदार विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सोसावा लागला. लोकमत प्रतिनिधीने शिवाजीनगरातील प्रभाग क्रमांक १२ च्या भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, विद्याभवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि प्रभाग क्रमांक ७ सेंट फ्रान्सिस हायस्कूल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मनपा शाळा, सीओईपी येथील मतदार कक्षांची पाहणी केली असता पुणे महापालिकेची यंत्रणा तोकडी पडल्याचे समोर आले.
निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, दिव्यांग आणि ज्येष्ठ व अपंग मतदारांना रॅम्प या सुविधा पुरविणे आवश्यक होते. मात्र, लोकमतच्या पाहणीत अशा सुविधा कुठेही बघायला मिळाल्या नाहीत. या सुविधांबाबत जाब विचारणाऱ्या मतदारांसोबत मतदान अधिकारी अरेरावी, उद्धट भाषा वापरताना दिसले.
मतदार केंद्र एकीकडे आणि बूथ भलतीकडेच यातील अंतरात मोठी तफावत असल्याने बूथवर जाऊन मतदान चिठ्ठी घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना रस्ते ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागली. यासाठी कोणतीही यंत्रणा महापालिकेने लावली नसल्याने ज्येष्ठ, आजारी, दिव्यांग व अपघात झालेल्या मतदारांना स्वत:च बूथ शोधत चिठ्ठी मिळवावी लागली. त्यात प्रत्येक मतदान केंद्राच्या यादीत एकाच कुटुंबातील काही मतदारांची नावे दुसऱ्या मतदान केंद्रात टाकल्याने ज्येष्ठांसह सर्वच मतदारांची त्रेधातिरपीट उडताना दिसत होती. कुठल्याही मतदान केंद्राची माहिती सहज उपलब्ध होईल अशा पद्धतीने दिशादर्शक फलक न लावल्याने मतदारांना बराच वेळ मतदान केंद्र शोधण्यातच वेळ घालवावा लागला. दरवेळी बीएलओमार्फत घरोघरी मतदार चिठ्ठीचे वाटप केले जात होते. मात्र, यावेळी पुणे महापालिका मतदान जनजागृतीसाठी तोकडी पडल्याची खंत मतदार लोकमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त करत होते.
पाटील वस्ती सीईओपी, पीएमसी काॅलनीकडील मतदान केंद्रांकडे जाताना मतदारांना वाहतूककोंडीचा मोठा सामना करावा लागला. कुठल्याही मतदान केंद्रावर प्रतीक्षा कक्ष, टोकन व्यवस्थेची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. रांगेमध्ये उभे असलेल्या मतदारांना बसण्यासाठी खुर्ची आणि बाकडे कुठेही ठेवण्यात आले नव्हते. कर्मचाऱ्यांसाठी आणलेल्या चार-दोन खुर्च्याही मोडकळीस आलेल्या होत्या. कुठल्याही मोकळ्या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर मंडपाची उभारणी करताना पुणे महापालिकेने कुचराई केल्याचे दिसले. तसेच केंद्रांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ठळकपणे मतदार केंद्र क्रमांक, दिशादर्शक फलक न लावल्याने मतदारांना केंद्राच्या इमारती शोधण्यासाठी पायपीट करावी लागली.
कुठे काय घडले?
शिवाजीनगर प्रभाग क्रमांक - ७ सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे मतदान करण्यासाठी आलेले पुण्याचे तत्कालीन पोलिस उपायुक्त तथा झोन क्रमांक १ चे प्रमुख विनोद लोखंडे मतदान करायला आले होते. सेंट फ्रान्सिस शाळेचा रॅम्प हा मोठ्या चढउताराचा असल्याने व उखडलेला असल्याने व मतदान केंद्राकडे जाणारी फरशीही तुटलेली असल्याने त्यांच्या वाहनचालकाला लोखंडे यांना व्हीलचेअरवरून मतदार केंद्राकडे घेऊन जाताना मोठा त्रास होत होता. यावेळी महापालिकेचा कुठलाही स्वयंसेवक हजर नव्हता. दरम्यान, पोलिसांच्या मदतीने त्यांचे मतदान पार पडले. पोलिसांनी त्यांना चांगली मदत केली. याच मतदान केंद्रावर प्रभाग क्रमांक - ७ च्या भाजप उमेदवार तथा माजी नगरसेविका रेश्मा अनिल भोसले या मतदानासाठी आल्या होत्या. मात्र, ओळखपत्र घरी विसरल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना मतदानापासून रोखले. यावर त्यांनी संयमाने उत्तर देत ओळखपत्र आणले, मगच मतदान केले.
राज्याच्या निवृत्त प्रधान सचिवांशी पीआरओची अरेरावी; महापालिका आयुक्तांकडे तक्रार
प्रभाग क्रमांक - १२ शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मतदानासाठी पत्नीसह आलेले राज्याच्या आरोग्य विभागाचे निवृत्त प्रधान सचिव डाॅ. सुभाष साळुंखे यांनी मतदान ओळखपत्र दाखवत मतदान केंद्रात कर्तव्य बजावत असलेले पीआरओ सचिन रामदास भंडारी यांना सभ्य भाषेत मतदान चिठ्ठी कुठे मिळेल, अशी विचारणा केली असता भंडारी यांनी ‘थेट मला माहिती नाही, तुम्हीच शोधा. मी नवीन आहे. येताना बघता आली नाही का’, असे चढ्या आवाजात अरेरावीची भाषा वापरून उत्तर दिल्यानंतर साळुंखे अस्वस्थ झाले. दरम्यान, त्यांच्या पत्नीलाही अपमानास्पद वाटले. साळुंखे यांना येथील उपस्थित मतदारांसमोर स्वत:चे पद सांगत पीआरओ भंडारी यांना अशी अरेरावीची भाषा वापरू नका म्हणत पुन्हा मदतीची विनंती केली. त्यावर भंडारी यांनी पुन्हा जोर चढवत ‘सांगितले न एकदा बाहेर जा’ म्हणत शिवराळ भाषा वापरली.
यानंतर साळुंखे आणि भंडारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, साळुंखे यांनी भंडारी यांना नाव व पद विचारले असता ‘जा नाही सांगत, कुठे तक्रार करायची ती करा. माझं कुणी काही करू शकत नाही’, असे उत्तर देत मतदान कक्ष गाठला. दरम्यान, हतबल झालेल्या निवृत्त प्रधान सचिवांनी थेट महापालिका आयुक्तांना फोन करत तक्रार करताच भंडारी यांनी माघार घेत साळुंखे यांची इतर मतदारांसमोर ‘मला आपले पद माहीत नव्हते, मला माफ करा’, असे म्हणत प्रकरण थांबविण्यासाठी माफी मागितली.
व्हीलचेअर असून अडचण, नसून खोळंबा
महापालिकेने मतदान केंद्रात येणाऱ्या ज्येष्ठ, अपंग, दिव्यांग व आजारी रुग्णांना व्हीलचेअरवर बसवून मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी एसपी महाविद्यालय, माॅडर्न, फर्ग्युसन, गरवारे महाविद्यालयातील मुलामुलींची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती केली. पण, रस्ताच धड नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना हाताला धरत न्यावे लागत असल्याने त्रासात भर पडली.
मतदान केंद्रावर महापालिकेतील निवडणूक विभागाचा बीएलओ नाही. येथील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली तर त्यांना काहीच माहीत नाही. महापालिकेच्या मतदानाच्या तीन याद्या मी पाहिल्या, माझे नाव कुठेच नाही. मतदानाचे ओळखपत्र असून, मला मतदान करता आले नाही. - राजूआप्पा गिरी, मतदार