PMC Election 2026: लोकशाही वाचवायचे असेल, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवा; सचिन अहिर यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:10 IST2026-01-05T16:09:03+5:302026-01-05T16:10:33+5:30
PMC Election 2026 पुणे महापालिका कर्जबाजारी झाली असून, गेल्या पंधरा वर्षांत सत्ताधाऱ्यांनी टेंडर आणि घोटाळ्यांवरच भर दिला आहे

PMC Election 2026: लोकशाही वाचवायचे असेल, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवा; सचिन अहिर यांचे आवाहन
पुणे : महापालिका निवडणुकीत भाजपकडून दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. पुणे महापालिकेत गेल्या वेळेस भाजपची सत्ता होती. त्यामध्ये प्रचंड लूट करण्यात आली, शिवाय राज्यात अनेक ठिकाणी बिनविरोध नगरसेवक करण्याचा काळाबाजार सुरू आहे. यामागे भविष्यात निवडणुकाच होऊ द्यायचे नाही, अशी भूमिका भाजपची आहे. लोकशाही वाचवायची असेल, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे, अशी टीका उद्धवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी केली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना, मनसे, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ व निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि.४) अहिर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अहिर म्हणाले की, ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांत ९६ ठिकाणी नगरसेवक बिनविरोध निवडून येणे संशयास्पद आहे. या खेळीमागे भविष्यात कार्यकर्तेच संपविण्याचा डाव आहे. भाजपच्या हाती सत्ता गेली, तर पुढे निवडणुका होतील की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपवर टीका करत असले, तरी त्यांना ही जाणीव उशिरा झाली आहे. भाजप पुणे लुटत असताना पालकमंत्री म्हणून अजित पवार काय करत होते, असा सवाल त्यांनी केला. अजित पवारांना दिलेले मत म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेले मत आहे, असेही ते म्हणाले.
सुजाण नगरसेवक निवडून द्या
पुणे महापालिका कर्जबाजारी झाली असून, गेल्या पंधरा वर्षांत सत्ताधाऱ्यांनी टेंडर आणि घोटाळ्यांवरच भर दिला. घोटाळे थांबवायचे असेल, तर आघाडीचे हात बळकट करून जास्तीतजास्त नगरसेवक निवडून द्यावेत. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात भीती वाटेल, असे नगरसेवक निवडून देणार का, असा सवाल करत मतदारांनी सजग राहावे, असे आवाहन अहिर यांनी केले.