PMC Election 2026: मी कोथरूड मध्ये राहतो तिथे आम्हाला कोण पैसे देणार? आम्हाला पैसे द्यायला लावतील - प्रवीण तरडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:35 IST2026-01-15T13:33:56+5:302026-01-15T13:35:31+5:30
PMC Election 2026 काही भागात पैसे वाटल्याचे कानावर येतंय, ती खूप खेदाची गोष्ट असल्याचे अभिनेते प्रवीण तरडे यांनी सांगितले आहे

PMC Election 2026: मी कोथरूड मध्ये राहतो तिथे आम्हाला कोण पैसे देणार? आम्हाला पैसे द्यायला लावतील - प्रवीण तरडे
पुणे: पुण्यात कालपासून पैसे वाटपाच्या घटना समोर आल्या आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या घटना उघडकीस आणल्या आहेत. परंतु काही ठोस पुरावे नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्याबाबत अभिनेते प्रवीण तरडे यांनी मिश्किल टिपण्णी केली असून ही खेदाची गोष्ट असल्याचे सांगितले आहे. पुण्यात त्यांनी सहपत्नी मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. मी कोथरूड मध्ये राहतो तिथे आम्हाला कोण पैसे देणार? आम्हाला पैसे द्यायला लावतील. काही भागात पैसे वाटल्याचे कानावर येतंय, ती खूप खेदाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तरडे म्हणाले, पुण्यात मतदानाची टक्केवारी चांगली राहील. मनातला महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणण्यासाठी लोक बाहेर पडले आहेत. ही गल्ली बोलतील कामांची निवडणूक आहे. लोकसभा आणि विधानसभा झाली. दररोजच्या सोशल मीडियावरील गप्पाटप्पा भांडण यामुळे लोक अस्वस्थ होतात. अस्वस्थ असले तरी मतदान करावे लागेल. मतदान केलं नाही तर तुम्हाला पुन्हा बोलण्याचा अधिकार राहत नाही.
सामंजस्याने लढाई झाल्या
पुण्यात ज्यांचं गेल्यावेळी सरकार होतं त्यांचं पुन्हा येणार आहे. पुण्यात दादागिरी की अण्णागिरी असं वातावरण होतं. त्यामुळे पुण्याच्या प्रचारात रंगत आली. पुण्याचा विकास सुरेश कलमाडी यांच्या काळात झाला. पुणे मॅरेथॉन, पुणे फेस्टिवल, गणेश कला, बालेवाडी स्टेडियम हे सुरेश कलमाडी यांच्या काळात झाली. आता मुरलीधर मोहोळ जोरात फाईट देत आहे. शेवटी ते पैलवान आहे. अजितदादा सुद्धा जोरात आहेत. कुणीही कमरेखाली टीका केली नाही. यंदाच्या निवडणुकीत तुंबळ महायुद्ध झाले पण रक्तपात झाला नाही. सामंजस्याने लढाई झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
16 तारखेपर्यंत एकमेकांवर टीका चालते
पुढील काळात पुण्यात फक्त मुरलीधर मोहोळ जोरात राहतील. माझा मित्र आहे म्हणून मी सांगत नाही. एकंदर राजकारणातील प्रगल्भता मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आली आहे. मुरलीधर मोहोळ मोठमोठ्या योद्धांना अंगावर घेतो. पण 16 तारखेपर्यंत एकमेकांवर टीका चालते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकत्रच लढणार असल्याचे तरडे म्हणाले आहेत.