PMC Election 2026: 'जेन झी' म्हणतात, राजकीय स्टंटबाजी अन् आरोप -प्रत्यारोप; सामान्यांच्या प्रश्नांवर बोलायला मुद्देच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:36 IST2026-01-08T13:34:17+5:302026-01-08T13:36:21+5:30

PMC Election 2026 सत्ता हस्तगत करण्यासाठी पैशांचे, फोडाफोडीचे राजकारण करताना सामान्य जनतेच्या प्रश्नाचा नेत्यांना विसर पडला आहे

PMC Election 2026 Gen Z says political stunts and accusations no issues to discuss on common people's issues | PMC Election 2026: 'जेन झी' म्हणतात, राजकीय स्टंटबाजी अन् आरोप -प्रत्यारोप; सामान्यांच्या प्रश्नांवर बोलायला मुद्देच नाहीत

PMC Election 2026: 'जेन झी' म्हणतात, राजकीय स्टंटबाजी अन् आरोप -प्रत्यारोप; सामान्यांच्या प्रश्नांवर बोलायला मुद्देच नाहीत

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘जेन झी’ म्हणून अलीकडेच जगभर प्रसिद्ध झालेल्या उसळल्या तरुणाईने प्रखर मत मांडलं आहे. नेत्यांना राजकीय स्टंटबाजी, आरोप प्रत्यारोप करायला आवडतं आहे. रोजगार, शिक्षण, पाणी, रस्ते अशा सामान्यांच्या प्रश्नांवर बोलायला त्यांच्याकडे मुद्दे नाहीत. सत्ता हस्तगत करण्यासाठी पैशांचे, फोडाफोडीचे राजकारण करण्यातच त्यांचा वेळ जात आहे. आम्हाला नागरिकांची समस्या सोडवणारा नेता पाहिजे असं मत जेन झी तरुणांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे.    

अनेकांना वाटते ‘जेन झी’ म्हणजे यापूर्वीच्या अँग्री यंग मॅनसारखीच एक कल्पना; पण अँग्री यंग मॅन कसाही उसळायचा, काहीही करायचा. ‘जेन झी’ तशी नाही. तिच्यात आग आहे; पण विचारपूर्वक व्यक्त होणारी. आपल्या मतांशी ती पक्की असते; पण म्हणून त्यासाठी ती काहीही करत नाही. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत अनेक युवकांनी असाच अनुभव दिला. फेक वोटिंगच्या घटना आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींमुळे त्यांच्यात अविश्वास वाढताना दिसतो, तर दुसरीकडे बदलाची तीव्र इच्छा समाजातील जागरूकतेची नवी दिशा दाखवते. शिक्षण, रोजगार, तंत्रज्ञान, पारदर्शक मतदान पद्धती आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन या मुद्यांवर युवकांची भूमिका ठाम आहे. राजकीय भाषेतील कटुता आणि घराणेशाहीबद्दलचा रोष ते स्पष्टपणे व्यक्त करतात. या ‘जेन झी’साठी लोकशाही म्हणजे केवळ मतदानाचा दिवस नाही, तर निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याचा हक्क आहे.

युवकांची संख्या मोठी आहे, आणि त्यांचे मतच भविष्य ठरवू शकतं. त्यांनी जागरूक राहून मतदान केलं तर समीकरणे पूर्णपणे बदलतील. तेच खरा परिवर्तनाचा आवाज आहेत; पण ते आमचा विचार करत नाहीत. आम्ही तो त्यांना करायला लावू.- संदीप सांगळे (युवा इंजिनिअर)

उमेदवार बूथवर येऊन भीती दाखवत आहेत, व्हिडीओ करत आहेत असे अनेक प्रकार आम्ही प्रत्यक्ष आणि सामाजिक माध्यमांवर पाहत आहोत. लोकशाहीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणारी ही वागणूक चिंताजनक आणि अस्वीकारार्ह आहे.”- विरेन धामणे, फायनान्स शाखेचा विद्यार्थी

आज सर्वच पक्षांची भाषा एकमेकांवर आरोप करणारी आहे. किमान सभ्य भाषेचा वापर करायला राजकारण्यांनी शिकले पाहिजे. खरा मुद्दाच हरवला आहे. सर्वांना फक्त विरोधकाला उत्तर द्यायचे आहे, जनतेला नाही. मग मतदारांनी विश्वास तरी कोणावर ठेवायचा?- कपिल पाल (इंजिनिअर)

रोजगार, पाणी, रस्ते, शिक्षण यासारखे मूलभूत प्रश्न मागे पडले आहेत. भांडणं आणि राजकीय स्टंट वाढले. लोकांना वास्तव समस्यांवर उत्तरं हवीत. मतदार त्यांनाच मते देतील, जे त्यांचा विचार करतात.- अभिजित शेंडे (इंजिनिअर)

निवडणुकीत पैशांचा प्रभाव दरवर्षी वाढत चाललाय. यामुळे प्रामाणिक उमेदवार मागे पडतात. मत खरेदी करण्याची संस्कृती धोकादायक आहे. ही प्रवृत्ती रोखण्यासाठी कठोर कायदे हवेत. जनक्षोभ झाला तर महागात पडेल.- प्रथमेश थळपते (विद्यार्थी)

शहरात किंवा दुसऱ्या गावात राहणाऱ्यांसाठी मतदान करणे फारच कठीण आहे. प्रवास खर्च, कामाचा ताण, वेळेची मर्यादा. यामुळे अनेक जण मतदान चुकवतात. या अडथळ्यांवर उपाय करायलाच हवा.- अमित वाकडे (युवक)

सुशिक्षित उमेदवारांना संधी देणे ही पक्षांची जबाबदारी आहे; अन्यथा विकासाची वाटचाल कधीच पुढे जाणार नाही. आपल्याकडे निवडणूक साक्षरतेची गरज आहे.- श्रीधर शहाणे (एमबीए विद्यार्थी)

शाळा-महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमातच निवडणूकविषयक शिक्षण द्यायला हवे. मत कशासाठी द्यायचे हेच अनेकांना माहिती नसते. जागरूकता वाढवली तर फेक आणि चुकीचे प्रभाव कमी होतील.- विनायक राऊत (युवा उद्योजक)

माध्यमांनी मुद्दे मांडायला हवेत; पण तेच आता ध्रुवीकरण वाढवत आहेत. वस्तुनिष्ठ माहिती कमी झाली आहे. लोकांना सत्य माहिती हवी आहे. माध्यमांवरचा विश्वास पुन्हा मिळायला हवा.” - मोनिका कांबळे (विधि शाखेची विद्यार्थी)

आपल्या नेत्यांना कसले भानच राहिलेले नाही. फारच वाईट स्थिती आहे. वादविवाद ठीक, पण वैयक्तिक हल्ले चुकीचे. मतदारांना सभ्य भाषा आवडते.- यशोधरा अटकोर, वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी

अयोग्य उमेदवारांना न स्वीकारण्याचा मतदारांसाठी नोटा हा लोकशाही हक्क आहे. त्याचा योग्य उपयोग व्हायला हवा.- संजना

“निवडणुकीत पारदर्शकता नसेल तर मतदारांचा विश्वास तुटतो. प्रत्येक मत सुरक्षित आहे हे जाणवणं महत्त्वाचं. प्रक्रियेतील शंका दूर करायला हव्यात. - ऋषिकेश तांबोळी (विद्यार्थी)

सत्ता हस्तगत करण्यासाठी पैशांचे, फोडाफोडीचे राजकारण करताना सामान्य जनतेच्या प्रश्नाचा नेत्यांना विसर पडला आहे. कोयता गँग, ट्रॅफिक, वाढलेली गुन्हेगारी, शहराचे बकालीकरण, नद्यांचे प्रदूषण, अतिक्रमण यांसारखे नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मुद्दे सोडून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. जागरूक मतदारांनी मताच्या अधिकाराचा वापर करून राजकीय पक्षांना वठणीवर आणण्याचे काम केले पाहिजे. – ॲड. सौरभ बिराजदार

राजकीय पक्षांनी तरुणांसाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजना, रोजगाराच्या संधी आणि पारदर्शक प्रशासनाचे आश्वासन दिल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. आमच्या पिढीला फक्त आश्वासने नाही, तर परिणाम पाहिजेत.- प्रतीक जाधव, (आयटी विद्यार्थी)

पुणे हे शिक्षणाचे केंद्र असले तरी पर्यावरणीय बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. नदी प्रदूषण, कचऱ्याचे ढीग आणि धूर-धूळ यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. पर्यावरणपूरक उपाययोजना जाहीर करणाऱ्या उमेदवारालाच माझे मत मिळेल.- समीर गायकवाड (कॉलेज विद्यार्थी)

Web Title: PMC Election 2026 Gen Z says political stunts and accusations no issues to discuss on common people's issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.