PMC Election 2026: ‘आबा बागुल यांना निवडून आणा, निधी मी देतो', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:15 IST2026-01-09T18:14:03+5:302026-01-09T18:15:03+5:30
PMC Election 2026 आबांना पुन्हा एकदा म्हणजे सातव्यांदा महापालिकेत पाठवा. नगरविकास विभागाच्या माध्यमातून प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि पुनर्विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ

PMC Election 2026: ‘आबा बागुल यांना निवडून आणा, निधी मी देतो', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 36 मध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित भव्य रोड शो आणि प्रचार रॅलीने संपूर्ण सहकारनगर, पद्मावती परिसर दुमदुमून गेला. या रॅलीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रभाग 36 मध्ये झालेल्या विकास कामे पाहून आबा बागुल यांच्या कार्याची विशेष दखल घेत, “आबांना पुन्हा एकदा म्हणजे सातव्यांदा महापालिकेत पाठवा. नगरविकास विभागाच्या माध्यमातून प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि पुनर्विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. हा ऐतिहासिक क्षण घडविण्याची संधी मतदारांनी सोडू नये, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान शिवसेनेच्या या रोड शो व रॅलीला सहकारनगर–पद्मावती परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. “पुणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवा,” असे आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभागातील सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता.
यावेळी आबा बागुल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभागातील प्रमुख आणि तातडीच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. त्यामध्ये आरोग्य सेवा: तळजाई टेकडी येथे 300 बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यास मान्यता देण्याची मागणी. शिक्षण: दर्जेदार व आधुनिक शिक्षणासाठी तळजाई टेकडी येथे राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या धर्तीवर नवीन शाळा उभारावी. तांत्रिक शिक्षण: आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी वाळवेकर नगर येथे अत्याधुनिक इंजिनिअरिंग कॉलेज (मोफत/सवलतीत शिक्षण) सुरू करावे. झोपडपट्टी पुनर्विकास: स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे मिळण्यासाठी परवानगी द्यावी. एसआरए प्रकल्प: शाहू वसाहतीच्या एसआरए प्रकल्पाला दिलेली स्थगिती कायम ठेवून रहिवाशांना स्वयंपुनर्विकासाची मुभा द्यावी. अशी मागणी केली.
या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभाग 36 च्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य आणि निधी उपलब्ध करून देण्याचा विश्वास व्यक्त केला. प्रभागातील पायाभूत सुविधा, आरोग्य–शिक्षण व्यवस्था आणि पुनर्विकासाला चालना देत पुण्याच्या विकासात मोलाची भर घालण्याचा निर्धार यावेळी व्यक्त झाला. या भव्य रॅलीमुळे प्रभाग 36 मध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला असून, शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.