PMC Election 2026: मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेट वस्तू अन् वाण वाटप; उमेदवारांवर येणार संक्रात, महापालिका आयुक्तांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 21:02 IST2026-01-09T21:01:02+5:302026-01-09T21:02:44+5:30
PMC Election 2026 भेट वस्तू व वाणाचे साहित्य वाटप करताना कोणी उमेदवार आढळला किंवा त्याबाबत तक्रार आली तर संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार

PMC Election 2026: मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेट वस्तू अन् वाण वाटप; उमेदवारांवर येणार संक्रात, महापालिका आयुक्तांचा इशारा
पुणे : सध्या महापालिकेची निवडणूक सुरू असल्याने मतदानापूर्वी येणाऱ्या संक्रात सणासाठी भेट वस्तू आणि सणाच्या वाणाचे साहित्य वाटप केल्याचे आढळल्यास किंवा त्यासंबंधी तक्रार आल्यास संबंधित उमेदवारांवर कारवाई होणार आहे. दरम्यान, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ४ दखलपात्र आणि ५ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.
कोणतीही निवडणूक असो, त्या निवडणुकीपूर्वी आणि निवडणूक लागल्यानंतर इच्छुकांकडून विविध कारणांचा आधार घेत मतदारांना भेटवस्तू वाटप करून आकर्षित केले जाते. हे प्रमाण महापालिकेच्या निवडणुकीमध्ये थोडे जास्तच असते. सध्या पावणे चार वर्षानंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मागील अनेक महिन्यांपासून विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून विविध दर्शन यात्रा, सणांच्या निमित्ताने भेटवस्तू वाटप करण्यासह खेळ पैठणीचे कार्यक्रम घेऊन मतदारांना आकर्षित केले जात आहे. आता महापालिकेची निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असताना मतदानाच्या आदल्या दिवसी महिलांचा संक्रांत सण आहे. या सणानिमित्त उमेदवारांकडून भेटवस्तू व वाण वाटप करून महिला मतदारांना आकर्षित केले जाऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारे भेट वस्तू व वाणाचे साहित्य वाटप करताना कोणी उमेदवार आढळला किंवा त्याबाबत तक्रार आली तर संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.
आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हे दाखल
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी प्रशासनाने ४ दखलपात्र आणि ५ अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय ६७ लाखाची रोकड, ३६ लाखाचा मुद्देमाल आणि २५ लाखाची दारू जप्त करण्यात आली आहे.