PMC Election 2026 : 'पक्षवाढीसाठी रस्त्यावर उतरून काम केले, मात्र..'; कोथरूडमध्ये भाजप निष्ठावंतांची उघड नाराजी, समाजमाध्यमांतून संताप व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:47 IST2026-01-01T15:46:17+5:302026-01-01T15:47:13+5:30
अनेकांनी फेसबुक, व्हॉट्सॲप व इतर माध्यमातून पक्ष नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

PMC Election 2026 : 'पक्षवाढीसाठी रस्त्यावर उतरून काम केले, मात्र..'; कोथरूडमध्ये भाजप निष्ठावंतांची उघड नाराजी, समाजमाध्यमांतून संताप व्यक्त
कोथरूड: परिसरात भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर अधिक तीव्र होताना दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने अनेक इच्छुक उमेदवार आणि जुने कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी थेट समाजमाध्यमांचा आधार घेत आपली भूमिका जाहीर केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर डावलले गेल्याची भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. ‘पक्षवाढीसाठी रस्त्यावर उतरून काम केले, मात्र तिकीट वाटपात नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात आले,’ असा आरोप काहींनी केला आहे. त्यामुळे कोथरूडमधील भाजपची अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येत आहे.
या नाराजीचा परिणाम निवडणूक प्रचारावर तसेच मतांच्या गणितावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही नाराज कार्यकर्ते प्रचारापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणावर भाजपच्या स्थानिक व वरिष्ठ नेतृत्वाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, वाढती असंतोषाची लाट पक्षासाठी चिंतेची बाब ठरत आहे.