Pune Municipal Election 2026: पुण्यात भाजपनं खातं उघडलं; सिंहगड रोड भागातून मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:14 IST2026-01-02T15:13:31+5:302026-01-02T15:14:54+5:30
Pune Municipal Election results 2026 प्रभाग क्रमांक ३५ (सनसिटी - माणिकबाग) मध्ये ब व ड गटाच्या भाजपच्या उमेदवार मंजुषा दीपक नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे

Pune Municipal Election 2026: पुण्यात भाजपनं खातं उघडलं; सिंहगड रोड भागातून मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड
धायरी: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सिंहगड रस्ता परिसरात भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. प्रभाग क्रमांक ३५ (सनसिटी - माणिकबाग) मध्ये ब व ड गटाच्या भाजपच्या उमेदवार मंजुषा दीपक नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी नाट्यमयरित्या माघार घेतल्याने भाजपचा विजय सुकर झाला.
नागपुरें व जगतापांची 'हॅट्ट्रिक'...
प्रभाग ३५ मध्ये भाजपच्या मंजुषा नागपुरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अयोध्या शशिकांत पासलकर यांनी शड्डू ठोकला होता. मात्र, आज दुपारी अचानक पासलकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. नागपुरे या आता तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून महापालिकेत जाणार असून त्यांनी विजयाची 'हॅट्ट्रिक' साधली आहे. दुसरीकडे, भाजपचे दुसरे उमेदवार श्रीकांत जगताप यांच्यासाठीही ही निवडणूक सुखद ठरली. त्यांनीही हॅट्रिक साधली आहे. त्यांच्या विरोधात उभे असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार नितीन गायकवाड यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने जगताप यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.
विरोधकांना मोठा धक्का...
या प्रभागात महाविकास आघाडी तर्फे जोरदार लढत दिली जाईल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सिंहगड रस्ता हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, या बिनविरोध निवडीमुळे पक्षाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.