PMC Election 2026: महापालिकेच्या रणधुमाळीत महायुतीतील तीनही पक्ष भिडले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 12:07 IST2026-01-04T12:05:25+5:302026-01-04T12:07:04+5:30
- भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेकांवर टीका

PMC Election 2026: महापालिकेच्या रणधुमाळीत महायुतीतील तीनही पक्ष भिडले....
पुणे : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवार निश्चित होताच सत्ताधारी महायुतीतील प्रमुख पक्ष असलेले भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनी एकमेकांविरुद्ध तोफा डागल्या आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करत महापालिकेचा कारभार आपल्या हाती देण्याचे आवाहन पुणेकर आणि पिंपरी- चिंचवडकरांना केले आहे.
राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार कार्यरत असून शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन पक्ष सत्तेचे वाटेकरी आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून नुकत्याच झालेल्या नगर पंचायत व नगरपरिषांच्या निवडणुकीत या तिन्ही पक्षांना यश मिळाले आहे. या यशानंतर सत्तेतील मोठा भाऊ असलेल्या भाजप नेत्यांनी महापालिकेच्या निवडणुका शिंदेसेनेसोबत युतीच्या माध्यमातून लढवण्यात येणार असल्याचे जाहीर करत अजित पवारांचा पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, भाजप आणि शिंदेसेनेची युती फिस्कटल्याने बहुसंख्य महापालिकांमध्ये तिन्ही पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत.
निवडणूक जरी वेगवेगळी लढली तरी महायुतीमध्ये कटुता येणार नाही, याची काळजी तीनही पक्ष प्रचारादरम्यान घेतील असे सांगण्यात आले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपून उमेदवार निश्चित झाल्याबरोबर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर टीकेची तोफ डागली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रचाराच्या पहिल्याच दिवशी एकमेकांवर टीका करत निवडणुकीचा धुराळा उडवून दिला आहे.
उमेदवारी यादीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचाच भरणा : मोहोळ
केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘कोयता गँग संपली पाहिजे, पुण्यातील गुन्हेगारी संपली पाहिजे, असे पालकमंत्री सांगतात. मात्र, त्यांच्या उमेदवारांची यादी पाहता या टोकापासून त्या टोकापर्यंत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे कोणत्या तत्त्वात बसते, हेच कळत नाही. अशा उमेदवारांमुळे पुण्यातील गुन्हेगारी वाढणार असून पुणेकर त्यांना मतदानातून चोख उत्तर देतील.’ शिंदे सेनेच्या नेत्यांवर टीका करताना मोहोळ म्हणाले, ‘‘ज्या पक्षाचा एकच नगरसेवक आहे, ते महापालिकेच्या सर्व जागा लढवण्याची भाषा करत आहेत.’’
पुण्यातून गुन्हेगार व्यक्ती थेट परदेशात पळून जातेच कशी? : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘पुण्यातून एक गुन्हेगार व्यक्ती थेट परदेशात पळून गेली आहे. त्याला पासपोर्ट कोणी दिला? कसा दिला? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. गुन्ह्याच्या आरोपाखाली असलेली व्यक्ती परदेशात कशी जाते? पासपोर्ट देताना काय तपासणी झाली, कोणाच्या शिफारशीने तो मिळाला, हे स्पष्ट व्हायला हवे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ताधारी राहिलेल्या भाजपने जनतेची कामे करण्यापेक्षा भ्रष्टाचार करण्यावरच जास्त भर दिला. विकासकामांसाठी तरतूद केलेला निधी खर्च करता आला नाही, हे प्रशासनासह कारभाऱ्यांचे अपयश आहे. पुण्याचा विकास करण्यासाठी कारभारी त्रिकुट बदला.
आम्ही आरोप केल्यास तुमच्या अडचणी वाढतील : रवींद्र चव्हाण
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, अजित पवार यांनी आमच्यावर टीका करताना स्वत:मध्ये डोकावून पाहावे, ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या पक्षाबद्दल बोलत आहेत. आम्ही मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत. हे दोन्ही नेतृत्व योग्य नाही, असे अजित पवार यांनी सांगावे. आम्ही आरोप करू लागलो तर त्यांना फार अडचणी होतील. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप कसे करावेत, हे अजित पवार यांनी ठरवले पाहिजे.
नगरसेवक पन्नासवर कसे न्यायचे हे शिवसैनिकांना कळते : उद्योगमंत्री उदय सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, की नगरसेवकांची संख्या एक वरून पन्नासवर कशी न्यायची हे शिवसैनिकांना चांगले माहिती आहे. त्यामुळे कोणीही आम्हाला कमी समजू नये. आम्हाला उमेदवार मिळणार नाहीत, असे काही जण म्हणत होते. आणखी एक दिवस मिळाला असता, तर सर्व १६५ जागांवर उमेदवार उभे केले असते. विकासाचे काम फक्त एकनाथ शिंदे करू शकतात. आपल्याला तेरा दिवसांत समोरच्याचा तेरावा घालायचा आहे. महापालिकेची निवडणूक धनशक्ती विरुद्ध शिवशक्ती होणार आहे. आपल्याला कुणावरती टीका करण्याची गरज नाही, टीका करण्याचे काम अजितदादा करत आहेत. आम्ही जागावाटपासाठी शेवटपर्यंत भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात होतो. त्यांना वाटले ते त्यांनी केले. मात्र, आम्हाला विचारात घेतल्याशिवाय महापौर होणार नाही.