PMC Election 2026: पुण्यात पहिल्या २ तासात ५.५० टक्के तर पिंपरीत ७ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:07 IST2026-01-15T11:06:23+5:302026-01-15T11:07:19+5:30
PMC Election 2026 पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. तर पिंपरी चिंचवडच्या ३२ प्रभागांसाठी १२८ जागा आहेत.

PMC Election 2026: पुण्यात पहिल्या २ तासात ५.५० टक्के तर पिंपरीत ७ टक्के मतदान
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. तर पिंपरी चिंचवडच्या ३२ प्रभागांसाठी १२८ जागा आहेत. पुण्याच्या ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. तर पिंपरीत ६९२ उमेदवार लढत आहेत. आज सकाळपासून दोन्हीकडे उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे.
पुण्यात पहिल्या २ तासात सरासरी 5.50 टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्या २ तासांत सरासरी ७ टक्के मतदान झाले आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला आहे. काही भागात मशीन बंद असल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे अनेकांना ताटकळत राहावे लागले आहे. पिंपरीत बऱ्याच भागात मतदार यादीत गोंधळ झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, मतदान केंद्रांमध्ये मोबाईल फोन नेण्यास घातलेल्या बंदीमुळे काही ठिकाणी वादाचे प्रसंगही पाहायला मिळाले. मतदानासाठी आलेल्या मतदारांनी मोबाईल नेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करत निवडणूक कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. मात्र निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदान केंद्राच्या आत मोबाईल नेण्यास मनाई असल्याचे स्पष्ट करत कर्मचाऱ्यांनी नियमांची अंमलबजावणी केली.
महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक प्रभागांमध्ये मतदार यादीबाबत गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. अनेक मतदारांना अद्याप मतदार स्लिप मिळालेल्या नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही भागांत घराघरांत स्लिप वितरणच झाले नसल्याचे मतदारांनी सांगितले. त्यामुळे मतदान केंद्र शोधण्यात अडचणी येत असून सकाळच्या वेळेत अनेक मतदार परत फिरल्याचेही आढळले.