PMC Election 2026: पुण्यात जागा १६५; आघाडीत २२० जणांना उमेदवारी, उमेदवारांच्या मनधरणीसाठी नेत्यांची दमछाक होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:05 IST2026-01-01T11:04:35+5:302026-01-01T11:05:50+5:30
PMC Election 2026 महाविकास आघाडीत काँग्रेसकडून १०५, उद्धवसेनेकडून ७१ आणि मनसेकडून ४४ जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत

PMC Election 2026: पुण्यात जागा १६५; आघाडीत २२० जणांना उमेदवारी, उमेदवारांच्या मनधरणीसाठी नेत्यांची दमछाक होणार
पुणे : महाविकास आघाडीतील वाटेकरी कमी झाल्यानंतरही प्रत्यक्षात काँग्रेस, उद्धवसेना आणि मनसे या तिन्ही पक्षांकडून उमेदवारी देताना जादा ‘एबी फॉर्म’चे वाटप करण्यात आल्याने बिघाडी झाली आहे. काँग्रेसकडून १०५, उद्धवसेनेकडून ७१ आणि मनसेकडून ४४ जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. जागा १६५ असल्याने अतिरिक्त उमेदवारांना माघार घेण्याबाबत मार्ग कसा काढायचा, अशा प्रश्न तिन्ही पक्षांपुढे उभा राहिला आहे. परिणामी अर्ज माघारीच्या दिवशी उमेदवारांची मनधरणी करताना नेत्यांची दमछाक होणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसांपर्यंत आघाडीत मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली. त्यात राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने आघाडीची साथ सोडली. त्यानंतर काँग्रेस, उद्धवसेना यांनी आघाडी कायम ठेवली. मुंबईत उद्धवसेना आणि मनसे एकत्र आल्यानंतर हाच प्रयोग पुण्यातही राबविण्यात आला आहे. त्यामुळे या आघाडीत मनसेचाही समावेश करण्यात आला. मात्र, कार्यकर्त्यांचा वाढता दबाव आणि आघाडीचे नक्की चित्र स्पष्ट होत नसल्यामुळे या तिन्ही पक्षांनी अर्ज भरण्यास काही तास शिल्लक राहिले असताना खिरापतीसारखे एबी फॉर्मचे वाटप केले. त्यामुळे पक्षांना रात्री उशिरापर्यंत भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाला अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करता आली नाही.
दरम्यान, गुरुवारी (दि. ३१) याबाबतचे चित्र पक्षांच्या पातळीवर स्पष्ट होणार. अर्ज मागे घेण्यास दोन दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंत तरी काही प्रभागात चौरंगी, तर काही प्रभागात पंचरंगी लढत होणार आहे. काँग्रेस आणि उद्धवसेना यांच्यात अधिकृत आघाडीची घोषणा झाली आहे. तर उद्धवसेना आणि मनसे यांच्यात युती झाली आहे. आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला १०० जागा, तर शिवसेनेला ६५ जागा आल्या होत्या. उद्धवसेनेने ६५ जागांमधून २१ जागा मनसेला देण्याचे निश्चित केले होते. प्रत्यक्षात काँग्रेसकडून १०५ हून अधिक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर उद्धवसेनेकडून ७१ जागांवर उमेदवारीचे वाटप करण्यात आले. मनसेने ४४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. आघाडीत जागा वाटपात पक्षाला वाट्याला आलेल्या जागांपेक्षा अधिक ठिकाणी तिन्ही पक्षांकडून उमेदवारीचे वाटप करण्यात आल्याचे उघड झाल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे. मात्र, आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही, यांची काळजी घेतली जाणार आहे, असा दावा या पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी वाट्याला आलेल्या जागेपेक्षा अधिकच्या जागेवरील उमेदवारांना देण्यात आलेले ‘एबी फॉर्म’ रद्द करण्यासाठी पक्षाचे अधिकृत पत्र (सी फॉर्म) देण्यात येणार आहे. हा फॉर्म दिल्यानंतर एकाच प्रभागात दोन ते तीन जणांना उमेदवारी दिली गेली आहे, त्यापैकी कोणाला अधिकृत उमेदवारी देणार, उर्वरित उमेदवारांनी माघार घेतली नाही, तर पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरांची संख्या वाढणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही डोकेदुखी कशी थांबविणार असा प्रश्न नेत्यांना पडला आहे.
आघाडीतील काँग्रेस-उद्धवसेना-मनसे यांनी वाट्याला आलेल्या जागांपेक्षा अधिक जागा वाटप करण्यात आले आहे. मात्र, त्याही परिस्थितीमध्ये उद्धवसेना व मनसे या दोन्ही पक्षांनी उमेदवारी वाटप करताना एखाद- दुसरा प्रभाग वगळता दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर येणार नाहीत, यांची काळजी घेतली आहे. त्यामुळे आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या काही प्रभागात शिवसेना-मनसेच्या उमेदवार रिंगणात असणार आहेत.