Pimpri Chinchwad Mayor : येत्या ६ फेब्रुवारीला महापौर-उपमहापौर निवड; २ फेब्रुवारीला अर्ज प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 14:02 IST2026-01-25T14:02:27+5:302026-01-25T14:02:46+5:30
- प्रत्येक समितीत महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी किमान ५० टक्क्यांची तरतूद

Pimpri Chinchwad Mayor : येत्या ६ फेब्रुवारीला महापौर-उपमहापौर निवड; २ फेब्रुवारीला अर्ज प्रक्रिया
पिंपरी : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (६ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजित केली आहे. दरम्यान, महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयाकडून यासंदर्भात शनिवारी (२४ जानेवारी) परिपत्रक काढण्यात आले.
महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुकांनी सोमवारी (२ फेब्रुवारी) दुपारी ३ ते ५ या वेळेत नगरसचिव कार्यालयात अर्ज दाखल करावेत. उमेदवारी अर्ज कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहणार असून, ते पूर्ण भरून त्याच दिवशी सादर करणे आवश्यक आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.
महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्थायी समिती व विविध विषय समित्यांवरील सदस्यांची नियुक्तीही याच निवडणूक प्रक्रियेंतर्गत करण्यात येणार आहे. समित्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व किमान ५० टक्के राहील, याची तरतूदही करण्यात आली आहे. महापालिकेच्या या विशेष सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून सहकार आयुक्त दीपक तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर व उपमहापौर पदाची निवड महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ तसेच महापौर व उपमहापौर निवड नियम २००६ व त्यानंतरच्या सुधारित नियमांनुसार पार पडणार आहे.