PMC Election Results 2026: महापालिका कमिशन खाण्याची जागा नाही, अन्यथा गय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 14:29 IST2026-01-18T14:24:41+5:302026-01-18T14:29:21+5:30

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवनिर्वाचित नगरसेवकांना तंबी 

PCMC Election Results 2026 There is no place to eat municipal commission, otherwise there is no way | PMC Election Results 2026: महापालिका कमिशन खाण्याची जागा नाही, अन्यथा गय नाही

PMC Election Results 2026: महापालिका कमिशन खाण्याची जागा नाही, अन्यथा गय नाही

पुणे : महापालिका ही समाजसेवा करण्याची जागा आहे, ही कमिशन खाण्याची जागा नाही. कोणी कमिशन खाण्याचा धंदा केला, तर त्याची गय केली जाणार नाही, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांना दिली.

महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. निवडणूक निकालानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची शाळा घेतली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील आमदार उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, आपण पुण्यात इतिहास रचला असून, त्याचे तुम्ही सर्व शिल्पकार आहात. गेल्या ३०-३५ वर्षांत पुणे महापालिकेत इतके बहुमत कोणीही मिळवले नाही. पुण्यातील लढत अत्यंत चुरशीची असेल अशी चर्चा झाली. पण, पुणेकरांनी ती एकतर्फी ठरवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर पुणेकरांनी पुन्हा एकदा आपल्याला पसंती दिली आहे. त्यामुळे जनतेच्या विश्वासाला पात्र राहून आपणास काम करायचे आहे. पुणे महापालिका देशातील सर्वोत्तम महापालिका ठरावी, यासाठी झपाटून प्रामाणिक, पारदर्शी कारभार करा. पुणेकरांचा हाच विश्वास आपण सार्थ केला तर पुढील पंचवीस वर्ष आपल्याला कोणी हटवू शकणार नाही.

महापालिका हे आर्थिक, सामाजिक विकासाचे माध्यम आहे. आपल्याला पुण्याच्या विकासाचे पुढील पाच वर्षांचे नियोजन करायचे आहे. पुढील काळात कोणाला महापौर, स्थायी समितीची पदे मिळतील. पक्ष ज्याला जी जबाबदारी देईल, ती त्याने पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. कोणी कितीही मोठा असला, तरी कोणाचाही उन्माद, गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही. आपली प्रतिमा हे राजकारणातील सर्वांत मोठे धन आहे. तुमची प्रतिमा ही भाजपची प्रतिमा आहे. या प्रतिमेला तडा जाऊ न देता सर्वांनी पुणे महापालिकेत काम करावे. कोणी कमिशनखोरी करायचा प्रयत्न केला तर खपवून घेणार नाही. त्यांची गंभीर दखल घेईल, असाही इशारा फडणवीस यांनी दिला.

विकास योजनांमुळे पुणेकर आपल्या पाठीशी उभे : फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयानंतर एकही दिवस शांत बसत नाहीत. दुसऱ्याच दिवशी ते पुढील पाच वर्षांचे नियोजन करतात. तसेच आपल्यालाही पुढील पाच वर्षांच्या विकासकामांचे नियोजन करायचे आहे. पुण्यासाठी आपण मांडलेल्या विकास योजनांमुळे पुणेकर आपल्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. पुण्यासाठी नियोजित केलेल्या योजनांचे प्रत्यक्ष काम दोन वर्षांत आपण सुरू करू शकू, असे नियोजन करून काम करा, असे यावेळी फडणवीस म्हणाले.

Web Title : महापालिका में भ्रष्टाचार की कोई जगह नहीं: फडणवीस की चेतावनी

Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने नवनिर्वाचित पुणे और पिंपरी-चिंचवड नगरसेवकों को भ्रष्टाचार के खिलाफ चेतावनी दी। उन्होंने जनसेवा, पारदर्शिता और विकास के वादों को पूरा करने पर जोर दिया। फडणवीस ने उनसे ईमानदारी से काम करने का आग्रह किया और किसी भी कदाचार के खिलाफ चेतावनी दी, क्योंकि उनकी छवि भाजपा को दर्शाती है।

Web Title : No Room for Corruption in Corporation, Warns Fadnavis

Web Summary : Chief Minister Fadnavis cautioned newly elected Pune and Pimpri-Chinchwad corporators against corruption. He emphasized public service, transparency, and fulfilling development promises. Fadnavis urged them to work diligently and honestly, warning against any malpractices, as their image reflects on the BJP.