पवार काका-पुतणे एकत्र म्हणजे विलीनीकरणच; सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य नको - प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:51 IST2025-12-30T13:49:27+5:302025-12-30T13:51:03+5:30
सध्याच्या घडामोडींवरून भाजप-राष्ट्रवादी जवळीक वाढत असल्याचे स्पष्ट दिसत असून काँग्रेसनेही आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे

पवार काका-पुतणे एकत्र म्हणजे विलीनीकरणच; सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य नको - प्रकाश आंबेडकर
पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र आले म्हणजे प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले आहे. अजित पवारांच्या साथीने शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचे पहिले पाऊल टाकले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकर पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, लवकरच सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर ‘सेक्युलर’ मतदारांनी आश्चर्य वाटून घेऊ नये. सध्याच्या घडामोडींवरून भाजप-राष्ट्रवादी जवळीक वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसनेही आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. उद्धवसेनेच्या पोटात राज ठाकरे आहेत. त्यामुळे राज ठाकरे ज्या पक्षांसोबत युती करतील, त्या पक्षांसोबत काँग्रेसने जाऊ नये, अन्यथा महाराष्ट्राप्रमाणेच देशभरात काँग्रेसचे अस्तित्व कमी होईल.
पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावरच
ॲड. आंबेडकर म्हणाले की, मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आघाडी केली. इतर महापालिकांमध्ये भाजपवगळता इतर पक्षांशी आघाडी करण्याची चर्चा सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार आहे, असा निर्णय पक्षाने घेतला आहे.