Maval and Shirur Lok Sabha election campaign is completed | मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार तोफा थंडावल्या
मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार तोफा थंडावल्या

पिंपरी : गेले पावणेदोन महिना सुरू असणारी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी होणार असून, प्रचाराची सांगता शनिवारी सायंकाळी सहाला झाली. शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस, बसपा, वंचित बहुजन विकास आघाडीसह अपक्षांनी पदयात्रा, कोपरा सभा, मतदार संवाद करून प्रचाराची सांगता केली. प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता २ मार्चपासून सुरू झाली. अर्ज दाखल करण्याची मुदत ९ मार्चपर्यंत होती. १२ एप्रिलला माघारीचा दिवस होता. ४५ अर्ज दाखल झाले. त्यानंतर २८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर सात जणांनी माघार घेतली. त्यानंतर १३ मार्चला उमेदवारी अंतिम झाली. त्यात २१ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले. त्यानंतर उमेदवारीअर्ज अंतिम झाल्यानंतर रणधुमाळीला सुरुवात झाली. तिची सांगता आज झाली. 
शेवटचा दिवस फेºयांचालोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा शेवटचा दिवस हा प्रचार फेºया आणि रोड शोचा होता.

शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, राष्टÑवादीचे उमेदवार पार्थ पवार, वंचित बहुजन विकास आघाडीचे राजाराम पाटील, बहुजन समाज पक्षाचे संजय किसन कानडे, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम नारायण पाटील यांनी मतदार संपर्कावर भर दिला. बारणे यांच्या प्रचारार्थ चिंचवड विधानसभा, पिंपरी मतदारसंघातून रोड शो करण्यात आला. त्यात पालकमंत्री गिरीश बापट आणि प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांचा रोड शो झाला, तर लोणावळ्यातील पवार यांच्या रोडशोत अभिनेत्री नवनीत राणा यांना धक्काबुक्की झाल्याने महिला कार्यकर्त्या रोड शोमधून बाहेर पडल्या होत्या. तसेच क्रांतिकारी जयहिंद सेनेचे जगदीश श्यामराव सोनवणे, आंबेडकर राईट्स पार्टी आॅफ इंडियाच्या जया संजय पाटील, बहुजन मुक्ती पक्षाचे पंढरीनाथ नामदेव पाटील, भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश भिवाजी महाडिक, भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचे मदन शिवाजी पाटील, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे सुनील बबन गायकवाड, अपक्ष अजय हनुमंत लोंढे, अमृता अभिजीत आपटे, नवनाथ विश्वनाथ दुधाळ, प्रशांत गणपत देशमुख, बाळकृष्ण धनाजी घरत, राकेश प्रभाकर चव्हाण, राजेंद्र मारुती काटे, विजय हनुमंत रंदिल, सूरज अशोकराव खंडारे, सुरेश श्रीपती तौर, डॉ. सोमनाथ अर्जुन पौळ यांनीही मतदार संपर्कावर भर दिला. शेवटच्या दिवशी फेरी काढल्या. 


मतदार संघात दिग्गजांच्या झाल्या सभा
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री अनंत गीते, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, वंचित बहुजन विकास आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंढे, माजी मंत्री जयंत पाटील, सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे, अभिनेते आदेश बांदेकर या दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात सभा घेतल्या. तसेच  सेलीब्रेटीजचे रोड शोही करण्यात आले. रणधुमाळी सुरू झाल्यापासून राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. त्या तोफा थंडावल्या आहेत. 

राजकीय फ्लेक्स काढले
निवडणूक आयोगाच्या वतीने प्रचाराची मुदत संपल्यानंतर राजकीय फ्लेक्स काढण्याची कार्यवाही सुरू केली होती. चिंचवड, मोरवाडी, भोसरी, आकुर्डी, थेरगाव, पिंपरी, दापोडी परिसरात असणारे फ्लेक्स काढले आहेत. वाहनांवरील पोस्टरही काढण्याची कार्यवाही सुरू होती. तसेच राजकीय पक्षांनी तयार केलेले रथ त्यावरील चिन्ह काढण्याची तयारी सुरू होती. 

भरारी पथकांचे लक्ष
निवडणूक शांततेत व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने उपाययोजना केल्या जात असून प्रचार संपल्यानंतर जाहिर प्रवेश करणाºयांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. तसेच प्रलोबभने दाखविणारे, पैसे वाटप करणाºयांवरही आयोगाचे लक्ष आहे.  तसेच पोलिसांच्या वतीने तयार केलेल्या भरारी पथकांच्या वतीने तपासणी सुरू करण्यात आली आहे. शहरात बाहेरून येणाºया वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. 

बाहेरील नेत्यांना बंदी
मतदार संघात प्रचार सांगता झाल्यानंतर ४८ तासांत मतदार नसणाºया व्यक्तींना मतदार संघात बंदी घातलेली आहे. बाहेरील नेते मतदारांवर दबाव टाकू शकतात, असा अंदाज महायुतीने व्यक्त केला असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बाहेरील नेत्यांना बंदी असणार आहे. अशा प्रकारे कोणी आढळल्यास नागरिक, राजकीय पक्ष तक्रार करू शकतात.

जाहिर प्रचार संपल्यानंतर राजकीय प्रचार करणारे फ्लेक्स काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पोलिस आणि निवडणूक आयोगाची यंत्रणा संयुक्तपणे काम करीत आहे. तसेच राजकीय पक्षांनी आचारसंहितेचा भंग होणार नाही. याची दक्षता घेणे अपेक्षीत आहेत. तसेच कोणीही आचारसंहितेचा भंग करू नये, असे आढळल्यास गुन्हे दाखल केले जातील. 
-कविता द्विवेदी,
निवडणूक निर्णय अधिकारी 


Web Title: Maval and Shirur Lok Sabha election campaign is completed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.