Manchar Nagar Parishad Election Result 2025: मंचरमध्ये क्रॉस व्होटिंगचा फटका; नगरसेवक राष्ट्रवादीचे, नगराध्यक्ष शिंदेसेनेचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 11:19 IST2025-12-23T11:19:04+5:302025-12-23T11:19:21+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारात वापरलेले ‘विरोधक झाले पंक्चर, शिंदेसेनेने जिंकले मंचर’ हे वाक्य निकालातून प्रत्यक्षात उतरले आहे.

Manchar Nagar Parishad Election Result 2025: मंचरमध्ये क्रॉस व्होटिंगचा फटका; नगरसेवक राष्ट्रवादीचे, नगराध्यक्ष शिंदेसेनेचा
मंचर : मंचर नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, शिंदेसेनेचा नगराध्यक्ष निवडून आल्याने ‘गड आला पण सिंह गेला’, अशी अवस्था राष्ट्रवादीची झाल्याचे चित्र आहे. नगरसेवक पदावर राष्ट्रवादीला बहुमत मिळाले असतानाही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला अपेक्षित मतदान न मिळाल्याने हा निकाल चर्चेचा विषय ठरला आहे.
शिंदेसेनेचे नगराध्यक्ष म्हणून दत्ता गांजाळे यांची निवड झाली असून, सरपंच पदाच्या काळात तसेच कोरोना काळात केलेल्या कामाचीच ही पोचपावती असल्याचे बोलले जात आहे. मात्र, नगरसेवक कमी निवडून आल्याने शिंदेसेनेलाही ‘कही खुशी, कही गम’ अशीच परिस्थिती अनुभवावी लागत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारात वापरलेले ‘विरोधक झाले पंक्चर, शिंदेसेनेने जिंकले मंचर’ हे वाक्य निकालातून प्रत्यक्षात उतरले आहे.
मंचर नगरपंचायत प्रथमच अस्तित्वात आल्याने निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातून राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. त्यामुळे शिंदेसेनेचा बालेकिल्ला असलेले मंचर राष्ट्रवादीमय होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, शिंदेसेनेची ताकद त्या वेळी नगण्य होती. अशा परिस्थितीत उद्धवसेनेतील माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी शिंदेसेनेत प्रवेश करत पक्षाला नवे बळ दिले.
निवडणुकीपूर्वी गांजाळे यांनी सहलींचे आयोजन करत, तसेच नगरपंचायत प्रशासनावर सातत्याने टीका करत वातावरण तापवले. दररोज एक-एक प्रकरण उघडकीस आणल्याने शहरात त्यांची चर्चा वाढली. दुसरीकडे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत आल्याने पक्षाची ताकद वाढली खरी, मात्र जुने व नवे कार्यकर्ते यांचे मनोमिलन न झाल्याचा फटका निवडणुकीत बसला.
आढळराव समर्थक सुनील बाणखेले यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली; मात्र त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांना नगरसेवक पदासाठी अपेक्षित संधी न मिळाल्याने बंडखोरी झाली. शिवाजी राजगुरू व कल्पेश बाणखेले यांनी बंड पुकारले. त्यापैकी राजगुरू विजयी झाले, तर कल्पेश यांचा पराभव झाला. प्रचारात राष्ट्रवादीकडून सुसूत्रता दिसून आली नाही. दत्ता गांजाळे यांच्यावर थेट आणि प्रभावी टीका न झाल्याने मतदारांमध्ये संभ्रम कायम राहिला.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जाहीर सभा घेतल्या, मात्र सुरुवातीच्या सुस्त प्रचारानंतर शेवटच्या तीन दिवसांत केलेला जोर अपुरा ठरला. राष्ट्रवादीने भाजपसोबत युती करत त्यांना पाच जागा दिल्या; मात्र ही युती लाभदायक ठरली नाही. उलट यामुळे पक्षांतर्गत बंडखोरी वाढली आणि मुस्लिम मतदारही दुरावल्याची चर्चा आहे.
शिंदेंच्या सभेने वातावरणनिर्मिती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा सकाळी लवकर झाल्याने अपेक्षित शक्तिप्रदर्शन होऊ शकले नाही. त्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या जाहीर सभेला महिलांची मोठी गर्दी झाली. शिंदे यांच्या भाषणात दत्ता गांजाळे हेच केंद्रस्थानी राहिले. या सभेने वातावरण निर्मिती केली आणि त्याचा थेट परिणाम मतदानावर झाला. क्रॉस व्होटिंगचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला. अनेक प्रभागांमध्ये नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीला भरघोस मतदान झाले, मात्र नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पिछाडी राहिली. प्रभाग क्रमांक ४ आणि १६ मध्ये गांजाळे यांना चांगली आघाडी मिळाली. विशेषतः प्रभाग १६ मध्ये नगरसेवक पदाच्या राष्ट्रवादी उमेदवाराला २९४ मते मिळाली, तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला केवळ १३९ मते मिळाल्याने खाली एक, वर एक असे वेगवेगळे मतदान झाल्याचे स्पष्ट झाले.
उबाठा, शरद पवार गटाचा प्रभाव मर्यादित
आघाडी न केल्याचा फटकाही काँग्रेसला बसला. उद्धवसेना व शरद पवार गटाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला असला, तरी तो वैयक्तिक ताकदीवर. त्यामुळे दोन्ही पक्षांचा प्रभाव मर्यादित राहिला. नगराध्यक्ष एका पक्षाचा तर नगरसेवकांचे बहुमत दुसऱ्या पक्षाकडे अशी स्थिती निर्माण झाल्याने भविष्यात संघर्ष अटळ मानला जात आहे. अपक्ष उमेदवार प्राची थोरात यांनी दिलेली लढत लक्षवेधी ठरली. संपूर्ण पॅनल उभे राहिले असते, तर निकाल वेगळा लागला असता, अशी चर्चा आहे. मागील सात वर्षांत संजय थोरात यांनी तळागाळात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून कोणत्याही मोठ्या नेत्याचा पाठिंबा नसतानाही त्यांना भरघोस मते मिळाली.
शिंदेसेनेचा उत्साह वाढवणारा निकाल
राष्ट्रवादीतून बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडून आलेले शिवाजी राजगुरू आणि सोनाली बाणखेले हेही राष्ट्रवादीच्या चुकीच्या रणनीतीचेच द्योतक मानले जात आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल शिंदेसेनेचा उत्साह वाढविणारा, तर राष्ट्रवादीसाठी आत्मपरीक्षणाची गरज दर्शविणारा ठरला आहे. मंचरकरांनी दिलेला कौल धक्कादायक नसून अपेक्षितच होता, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.