Mahrashtra Election 2019 : महाराष्ट्राचा बिहार करायचाय का ? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 20:20 IST2019-10-18T20:15:28+5:302019-10-18T20:20:46+5:30
महापुरुषांना, साहित्यिकांना, कलाकारांना जातीपातीमध्ये वाटण्यात येत आहे. आपल्याला राज्याचा बिहार करायचे आहे का असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला.

Mahrashtra Election 2019 : महाराष्ट्राचा बिहार करायचाय का ? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
पुणे : कुठल्या ठिकाणी कुठल्या समाजाची लाेकं हे पाहून सध्या उमेदवार दिले जात आहेत. गेल्या 10 - 15 वर्षांपूर्वी राज्यात असे वातावरण नव्हते. देशाचं नेतृत्व करणारा महाराष्ट्र सध्या जातीपातींमध्ये सडताेय. आपल्याला महाराष्ट्राचा बिहार करायचाय का ? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला.
पुण्यात काेथरुडमध्ये राज ठाकरेंच्या सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. मतदारसंघामध्ये कुठल्या जातीचे, समाजाचे लाेक राहतात याप्रमाणे उमेदवार देणं या आधी घडत नव्हतं. राज्याला सध्या काय झालंय हे कळत नाही, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
राम गणेश गडकरींचा पुतळा पाडण्यात आला. पुतळा पाडणाऱ्यांना राम गणेश गडकरी काेण हे माहित आहे का? त्यांना वाटलं असणार नितीन गडकरींचे नातेवाईक असणार,पाडा पुतळा. सध्या महापुरुष, साहित्यिक, कलाकार यांना जातीपातींमध्ये वाटण्यात येत आहे. मतदारसंघामध्ये उमेदवार निवडताना एकच निकष हवा. उभा असलेला उमेदवार जनतेचे काम करणार की नाही. काेथरुडमधली निवडणूक तर अत्यंत साेपी आहे. इथला आमदार स्थानिक हवाय की बाहेरचा एवढाच निर्णय काेथरुडकरांनी करायचा आहे. पाटील निवडणुकीनंतर हाताला लागणार आहेत का ? परंतु अशा गाेष्टी घडतात कारण तुम्हाला गृहीत धरलं जातं. असेही ठाकरे यावेळी म्हणाले.