Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:38 IST2025-12-24T18:38:03+5:302025-12-24T18:38:35+5:30
२७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो

Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत स्थापन केलेल्या समितीमधून प्रशांत जगताप यांना वगळण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र अद्याप हा राजीनामा स्वीकारलेला नव्हता. अखेर आज त्यांनी राजीनामा दिल्याचे माध्यमांसमोर जाहीर केले.
प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्यावर काल खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने मुंबईला भेटीसाठी बोलावले होते. सुप्रिया सुळे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच मी राष्ट्रवादी पक्षात होतो आणि आहे असे त्यांनी काल सांगितले होते. आज मात्र जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधत थेट राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. जगताप यांच्या राजीनाम्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. प्रशांत जगताप यांनी २०१२ साली पुणे महानगरपालिकेचे महापौरपद स्वीकारले होते. त्यावेळी त्यांची नवी ओळख निर्माण झाली होती. आज अखेर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची साथ सोडली आहे. ते आता इथून पुढे कुठल्या पक्षात प्रवेश करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
२७ वर्षांनंतर पक्षाचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभार! २७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल. आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार! असं म्हणतं त्यांनी राजीनामा दिला आहे.