मागील वर्षीची परवानगी चालणार; पुण्यातील गणेशोत्सव निर्बंध अन् भयमुक्त होणार, आयुक्तांचा मंडळांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 12:52 IST2025-07-21T12:52:10+5:302025-07-21T12:52:37+5:30
पोलीस व प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत, यावर्षीच्या परवानगीची वेगळी गरज नाही

मागील वर्षीची परवानगी चालणार; पुण्यातील गणेशोत्सव निर्बंध अन् भयमुक्त होणार, आयुक्तांचा मंडळांना दिलासा
पुणे: यंदाचा गणेशाेत्सव निर्बंध आणि भयमुक्तमुक्त राहील. पोलिस व प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत. मागील वर्षीची परवानगी चालेल. यावर्षी परवानगीची वेगळी गरज नाही, असे स्पष्ट करत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेश मंडळांना माेठा दिलासा दिला.
निमित्त हाेते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा-२०२४ पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे. हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे रविवारी पार पडला. या प्रसंगी पोलिस आयुक्त अमितेश कुमार बाेलत हाेते. मंचावर डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
यात भोसले मार्ग भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने प्रथम, एरंडवणा येथील श्री शनि मारुती बाल गणेश मंडळाने द्वितीय, तर नाना पेठेतील पोटसुळ्या मारुती मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. नवी खडकी येरवडा येथील नवज्योत मित्र मंडळ ट्रस्टने चौथे, तर भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयुग मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. स्पर्धेत सहभागी झालेल्या १९४ मंडळे व शाळांपैकी १०६ मंडळे व शाळांनी पारितोषिके मिळविली. एकूण १४ लाख ९५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५) साजरे करणारे मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.