Pune Ganpati: आपलं मंडळ अग्निसुरक्षित आहे का? यंदा अग्निशमन दल घेणार आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 17:02 IST2023-09-17T17:02:04+5:302023-09-17T17:02:30+5:30
गणेशोत्सवाच्या काळात कुठेही आग व दुर्घटना घडू नये याबाबत जागरूक राहणे आवश्यक

Pune Ganpati: आपलं मंडळ अग्निसुरक्षित आहे का? यंदा अग्निशमन दल घेणार आढावा
पुणे : यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सवात शहरातील मंडळांसाठी ‘अग्निसुरक्षित गणेश मंडळ’ स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामधून गणेश मंडळांनी गणपती मंडळांनी आपले मंडळ आगीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत? याचा आढावा घेण्यात येणार आहे. पुणेअग्निशमन दल व फायर अॅन्ड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कुठेही आग व दुर्घटना घडू नये याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. अग्निशमन दल व एफएसएआय संयुक्तरित्या पुढाकार घेऊन शहरात आग व अपघातापासून मंडळे सुरक्षित कशी राहावीत? आणि जनमानसात याबाबत जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून ही संकल्पना साकारली आहे.
मंडळांनी नोंदणी करतेवेळी दिलेल्या अर्जामध्ये माहिती भरुन दिल्यावर त्याची छाननी होऊन अग्निशमन दलाकडील अग्निशमन अधिकारी आणि एफएसएआय संस्थेचे सदस्य हे प्रत्यक्ष मंडळांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. या पाहणीतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांचे बक्षीस जाहिर केले जाणार आहे. यामध्ये शहरातील जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी केले आहे.