भारतीय सैनिक करणार गणरायाची प्रतिष्ठापना; पुण्यातील दगडूशेठकडून 'श्रीं' ची प्रतिकात्मक मूर्ती रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 16:31 IST2021-08-27T16:27:02+5:302021-08-27T16:31:48+5:30
अरुणाचल प्रदेश व पंजाबमध्ये भारतीय सैनिक बसवणार दगडूशेठ गणपती

भारतीय सैनिक करणार गणरायाची प्रतिष्ठापना; पुण्यातील दगडूशेठकडून 'श्रीं' ची प्रतिकात्मक मूर्ती रवाना
पुणे : यंदा भारतीय लष्करातील १ आणि ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेश आणि पंजाबमधील पठाणकोट येथे दगडूशेठच्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रीं ची हुबेहूब २ फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार नुकतीच ही मूर्ती अरुणाचल प्रदेश व पठाणकोटकडे रवाना झाली.
ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने यांनी सैनिकांना ही मूर्ती सुपूर्त केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून भाविक पुण्यात येतात. मात्र, भारतीय सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये येता येतच असे नाही.
त्यामुळे १ मराठा बटालियनचे कर्नल जयकुमार मुदलियार आणि ६ मराठा बटालियनचे विनोद पाटील यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूतीर्ची प्रतिष्ठापना सीमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा सैनिकांच्या वतीने व्यक्त केली. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे विनंती करणारे पत्र पाठविले होते.
कर्नल जयकुमार मुदलियार यांनी पत्रात म्हटले की, पुण्यातून आमची बटालियन टेंगा व्हॅली, अरुणाचल प्रदेश येथे चायनीज बॉर्डर परिसरात जात आहे. मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरी करते. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूतीर्ची स्थापना आम्ही तेथे करु इच्छितो.
कर्नल विनोद पाटील यांनी पत्रात म्हटले की, सन २०११ पासून ६ मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. पठाणकोट सिमेवर गणेशाची मूर्ती स्थापन केल्याने मराठा बटालियनच्या सैनिकांना वेगळी उर्जा मिळणार आहे. तसेच या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल.