Ganesh Festival 2021: पुण्यात घरच्या घरीच करावे बाप्पांचे विसर्जन; महापौरांनी केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 18:33 IST2021-09-09T18:33:27+5:302021-09-09T18:33:34+5:30
शहरात २४७ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली

Ganesh Festival 2021: पुण्यात घरच्या घरीच करावे बाप्पांचे विसर्जन; महापौरांनी केलं आवाहन
पुणे : घराच्या घरी श्री गणेशमुर्तीचे विसर्जन करण्याकरीता पुणे महापालिकेने एकूण २०० मे.टन अमोनियम बायकाबोर्नेट सर्व क्षेत्रिय कार्यालयांव्दारे, प्रत्येक आरोग्य कोठ्यांच्या ठिकाणी आणि गणेश मंडळाच्या ठिकाणी नागरीकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच शहरात २४७ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. दरम्यान कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेता घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गणेश विसर्जनासंदर्भात माहिती देताना मोहोळ म्हणाले, प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयांमधील नागरिकांना सरासरी १२-१३ टन अमोनियम बायकाबोर्नेट वितरीत करण्यात आले आहे. तसेच ज्या नागरिकांना घरच्या घरी मूर्ती विसर्जन करणे शक्य नाही, अशा नागरिकांसाठी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत दीडशेपेक्षा जास्त मूर्ती विसर्जन रथ अर्थात फिरत्या हौदांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी गणेशोत्सव काळात पुणे महापालिका स्वच्छ सहकारी संस्थेमार्फत एकूण ८७ हजार ४४२ किलो निर्माल्य गोळा करण्यात आले होते. या वर्षी देखील सर्व गणेशमूर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याचबरोबर निर्माल्याचे वेगळे संकलन करून ठेवणाºया नागरिकांच्या घरी जाऊन, सर्व निर्माल्य कचरा वेचकांमार्फत अथवा घंटागाडीमार्फत ओला सुका कचरा व्यतिरिक्त वेगवेगळ्या पोत्यांमधून दि. १२, १५ आणि २० सप्टेंबर २०२१ रोजी घेतले जाणार आहे़ कोणीही निर्माल्य नदीपात्र, तलावात टाकू नये, असे आवाहन मोहोळ यांनी केले आहे.