"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:39 IST2025-12-26T15:37:58+5:302025-12-26T15:39:30+5:30
Prashant Jagtap: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातून बाहेर पडल्यानंतर पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी पुढील राजकीय भूमिका मांडली.

"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीला विरोध करत पुण्याचे माजी महौपार प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेसमधून (शरद पवार) बाहेर पडले. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांना काही पक्षातून ऑफर आल्या. मात्र, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर जगताप यांनी भूमिका मांडली.
मुंबईतील टिळक भवनामध्ये प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते.
वादावादी करून बाहेर पडलो नाहीये
प्रशांत जगताप म्हणाले, "काँग्रेस पक्षाचा १३५ वर्षांचा प्रवास आहे. पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून इथे दाखल होत आहे. आधीच्या पक्षातील नेत्यांचे आभार मानतो. काही वादावादी करून बाहेर पडलो नाहीये. गांधी, नेहरू आणि शिव-शाहू-आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्यासाठी इथे प्रवेश केला आहे."
आता पुणे भाजपाच्या ताब्यात
"माझी लढाई भाजप विरोधी, संघ विरोधी आणि दहशतवाद निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात आहे. गुन्हेगारीत पहिला नंबर पुण्याचा. भ्रष्टाचारात महाराष्ट्र पहिला आणि पुणे पहिले आहे. भाजपाच्या ताब्यात पुणे आहे", अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली.
"२६ वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. मी कधीही माध्यमांना काही सांगितलं नाही. आतादेखील मी तेच करेन. पक्षाबरोबर कायम राहून मी काम करेन. भाजपाला कोणी टक्कर देऊ शकतो, तर तो काँग्रेस पक्षच आहे. आता राजकारण बंद करेन, पण काँग्रेसमधून जाणार नाही. कोणाबद्दल दूजाभाव नाहीये. कोणाशी वैरही नाहीये", अशा भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केल्या.