"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:54 IST2026-01-14T17:52:06+5:302026-01-14T17:54:46+5:30
Ashwini Jagtap Shankar Jagtap: पिंपरी चिंचवड महापालिकेसाठीचे मतदान काही तासांवर आलेले असताना जगताप कुटुंबातील कलह समोर आला आहे. माजी आमदार अश्विनी जगताप यांनी एक स्टेट्स ठेवले असून, आमदार शंकर जगताप यांनी दिलेल्या उमेदवारावरच नमकहरामी केल्याचा आरोप केला आहे.

"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील संघर्ष महापालिका निवडणुकीच्या तोंडावर समोर आला आहे. माजी आमदारअश्विनी जगताप यांनी दीर शंकर जगताप यांनी दिलेल्या आमदारांवर नमकहराम असल्याचा ठपका ठेवला आहे. "तू १५ वर्षे भाऊ बरोबर नव्हता, तर त्यांच्या 'शेवटाची' वाट पाहत होतात. ज्या भाऊंनी तुला ओळख दिली, त्यांच्याच विरुद्ध इतकी वर्षे मनात विष पेरून ठेवले?", असे गंभीर विधान अश्विनी जगताप यांनी केले आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि माजी आमदार अश्विनी जगताप यांनी स्टेट्स ठेवले असून, त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आमदार शंकर जगताप यांनी माऊली जगताप यांना प्रभाग ३१ मधून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीवरून दीर-वहिनीत वाद उभा राहिला आहे.
माऊली जगताप यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर गुलालात माखलेला एक फोटो पोस्ट करत "पंधरा वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले", असे म्हटले होते.
अश्विनी जगतापांनी काय म्हटले आहे?
माजी आमदार अश्विनी जगताप यांनी माऊली जगताप यांचा हा फोटो स्टेट्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, "निष्ठा की विश्वासघात? '१५ वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण' असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप हे स्वप्न पाहताना तुला तुझीच लाज कशी वाटली नाही? जेव्हा स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप आपल्या कर्तृत्वाने राजकारण गाजवत होते, तेव्हा तू त्यांच्याच सावलीत बसून त्यांच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास?"
"याचा अर्थ असा की, तू १५ वर्षे भाऊ बरोबर नव्हता, तर त्यांच्या 'शेवटाची' वाट पाहत होतात. ज्या भाऊंनी तुला ओळक दिली. त्यांच्याच विरुद्ध इतकी वर्षे मनात विष पेरून ठेवले? हे स्वप्न नाही, तर ही नमकहरामी आहे ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप", अशी टीका अश्विनी जगताप यांनी केली आहे.
"विजयाचा गुलाल उधळताना भान विसरलास, पण लक्षात ठेव ते तुझे स्वप्न नाही, तर तुझ्या सडक्या वृत्तीचे आणि बुद्धीचे प्रदर्शन आहे", असा संताप माजी आमदार अश्विनी जगताप यांनी दीर शंकर जगताप यांनी दिलेल्या उमेदवाराबद्दलच व्यक्त केला आहे.
दीर-वहिनीमध्ये संघर्ष?
लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्यातील संघर्षाच्या चर्चा अनेकदा समोर आल्या आहेत. पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक, त्यानंतर २०२४ विधानसभा निवडणुकीवेळी दीर-वहिनीमध्ये संघर्ष बघायला मिळाला होता. सध्या तरी दोघांमधील संघर्ष मिटल्याची चर्चा होती, त्यातच आता हा नवा वाद समोर आला आहे.