गुंड लोकसभेपासून पंचायत समिती पर्यंत निवडून जाणे हे लोकशाहीला मारक - आनंदराज आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:11 IST2026-01-01T16:10:45+5:302026-01-01T16:11:14+5:30
फ्रेंच पद्धतीने इलेक्शन व्हावे, पक्षाने मतदान झाले तर गुंड निवडून येणार नाही. ते लोकशाहीला पूरक असेल

गुंड लोकसभेपासून पंचायत समिती पर्यंत निवडून जाणे हे लोकशाहीला मारक - आनंदराज आंबेडकर
कोरेगाव भीमा : सध्या निवडणुकीमध्ये गुंडांना प्रधान्य दिले जात असताना गुंड हे लोकसभेपासून पंचायत समिती पर्यंत निवडून जाणे हे लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत बदल होण्याची गरज असल्याचे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे २०८ व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर उपस्थित होते, याप्रसंगी भीमा कोरेगाव शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, कोरेगाव भिमा विजयरणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सजेर्राव वाघमारे, रिपब्लिकन विध्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे व रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांसह आदी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, गुंड हे लोकसभेपासून पंचायत समिती पर्यंत निवडून जाणे हे लोकशाहीला मारक असून हे इलेक्शन बदलले पाहिजे. फ्रेंच पद्धतीने इलेक्शन व्हावे, पक्षाने मतदान झाले तर गुंड निवडून येणार नाही. ते लोकशाहीला पूरक असेल. सध्याची परिस्थिती देशात निर्माण झाली हे न होण्यासाठी पक्ष निहाय मतदान व्हावे. तसेच आयत्या वेळी आयात उमेदवारांना उमेदवारी देणे हे दुदैर्वी आहे. मात्र मतदानाची पद्धत बदलली तर हे नक्की सुधारेल असे त्यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे दरवर्षी येणा-या बांधवांची प्रचंड संख्या वाढत असून राज्या बाहेरुन लोक येत आहे. येथील शौर्य दिनी आल्यानंतर लोकांना जाणीव होतेय कि, आपण शौर्यवाले लोक आहोत. लोकांना स्वत:ला एक अभिमान येथे आल्याने मिळतो असेही ते यावेळी म्हणाले आहेत.