पुण्यात डीजेमुक्त गणेशोत्सवाचे ऐतिहासिक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 08:40 IST2025-09-06T08:39:59+5:302025-09-06T08:40:35+5:30

Ganesh Mahotsav 2025: मोठ्या आवाजात वाजणारे डीजे, आक्षेपार्ह गाणी, गोंगाटामुळे गणेश उत्सवाचा धार्मिक व सांस्कृतिक गाभा हरवू लागला होता. याच पार्श्वभूमीवर उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते पुनीत बालन यांनी घेतलेला डीजेमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.  पुण्याच्या गणेशोत्सवाला शुद्ध, परंपरागत आणि विधायक वळण  देण्याचा  सामूहिक संकल्प असून डीजेमुक्त गणेशाेत्सवाचा पुनीत पॅटर्न झाला आहे. 

Ganesh Mahotsav: Historic step for DJ-free Ganeshotsav in Pune | पुण्यात डीजेमुक्त गणेशोत्सवाचे ऐतिहासिक पाऊल

पुण्यात डीजेमुक्त गणेशोत्सवाचे ऐतिहासिक पाऊल

पुणे शहराची ओळख केवळ शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रापुरती मर्यादित नाही, तर येथे साजरा होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवामुळे पुण्याचे सांस्कृतिक वैभव संपूर्ण जगभरात पोहोचले आहे. दरवर्षी लाखो भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी शहरात येतात आणि गणेशोत्सवाच्या मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम यामुळे पुण्याचा उत्सव वेगळाच ठरतो. मात्र गेल्या काही वर्षांत डीजे संस्कृतीने या पावन उत्सवाचे स्वरूप काहीसे विकृत केले आहे. मोठ्या आवाजात वाजणारे डीजे, आक्षेपार्ह गाणी, गोंगाटामुळे उत्सवाचा धार्मिक व सांस्कृतिक गाभा हरवू लागला होता. याच पार्श्वभूमीवर उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते पुनीत बालन यांनी घेतलेला डीजेमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.  पुण्याच्या गणेशोत्सवाला शुद्ध, परंपरागत आणि विधायक वळण  देण्याचा  सामूहिक संकल्प असून डीजेमुक्त गणेशाेत्सवाचा पुनीत पॅटर्न झाला आहे. 

पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा लोकमान्य टिळक, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केली. त्याचा उद्देश होता लोकांना एकत्र आणणे आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी समाजात जागृती घडवणे.  यांनीही या चळवळीत पुढाकार घेतला. 132 वर्षांहून अधिक काळ ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे. स्वातंत्र्यानंतरही गणेशोत्सव हा केवळ धार्मिक विधी न राहता सांस्कृतिक मंच झाला. नाटकं, व्याख्यानं, शैक्षणिक उपक्रम, समाजजागृती या सगळ्याचा संगम गणेशोत्सवात होत असे.

परंतु अलीकडच्या काळात मंडळांनी केवळ दिखावा करण्यासाठी मोठ्या डीजे गाड्या, लेझर शो, आक्षेपार्ह गाणी यांचा वापर सुरू केला. यामुळे परंपरेला गालबोट लागल्याचे जाणकार नागरिकांनी वारंवार व्यक्त केले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशाेत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख असलेल्या पुनीत बालन यांनी यावर समाजात व्यापक मंथन घडवून आणायचे ठरविले. त्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला. पुण्याच्या गणेशाेत्सवात महत्वाची भूमिका असलेल्या मान्यवरांचे मार्गदर्शन घेतले. यातूनच डीजेमुक्त गणेशाेत्सवाची कल्पना समाेर आली.

गेल्या अनेक वर्षांपासून पुनीत बालन हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशाेत्सव मंडळासाेबतच इतरही अनेक मंडळांना आर्थिक मदत देत आहेत. डीजेमुक्त गणेशाेत्सवाची संकल्पना आपल्यापासूनच सुरू करण्यासाठी त्यांनी यंदाच्या वर्षी कठाेर निर्णय घेतला. “गणेशोत्सव हा आपल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेनुसारच साजरा झाला पाहिजे. डीजेवर अश्लील गाणी वाजवून बाप्पाचे पावित्र्य भंग करणाऱ्या मंडळांना आमच्याकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा जाहिरात मिळणार नाही”, अशी भूमिका त्यांनी घेतली.

त्यांच्या या पुढाकाराचा केवळ मंडळांनाच नव्हे तर संपूर्ण पुण्याला दिलासा मिळाला . कारण विसर्जन मिरवणुकीत होणाऱ्या गोंगाटामुळे नागरिकांना होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला होता. रुग्णालये, शाळा, वयोवृद्ध नागरिक यांना या प्रचंड आवाजाचा फटका बसत होता. काही वेळा डीजे गाड्यांमुळे झालेल्या अपघातात तरुणांचे प्राणही गेले आहेत. अशा परिस्थितीत डीजेमुक्त उत्सवाची संकल्पना ही काळाची गरज हाेती. त्यासाठी तळमळीने जागृती करणाऱ्या गणेशाेत्सव कार्यकर्त्याला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. 

पुनीत बालन यांनी डीजेमुक्त गणेशाेत्सवाची मुहर्तमेढ दहीहंडीलाच राेवली हाेती. पुण्यातील  पहिली डीजेमुक्त दहीहंडी साजरी करून दाखवली होती. 26 मंडळांनी एकत्र येऊन ढोल-ताशांच्या गजरात उत्सव पार पाडला. हजारो नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “डीजेशिवाय उत्सव रंगत नाही” ही धारणा या प्रयोगाने चुकीची ठरवली. त्याचाच विस्तार आता गणेशोत्सवात होत आहे.

पुण्यातील  नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की डीजेमुळे गंभीर रुग्णांना होणारा त्रास टळेल. पालकांचे म्हणणे आहे की मुलांच्या अभ्यासावर होणारा परिणाम आता कमी होईल. पर्यावरणप्रेमींनी या उपक्रमाला दुहेरी पाठिंबा दिला.  कारण आवाजप्रदूषणाबरोबरच डीजे गाड्यांमुळे होणारे वायूप्रदूषणही कमी होईल.

ढाेलताशा, बॅंड यासारख्या पारंपरिक कलांना डीजेमुक्तीमुळे नवीन उभारी मिळणार आहे. भारतीय पारंपरिक कलांना गणेशाेत्सवाचे व्यासपीठ मिळणार आहे. या विधायक निर्णयाबद्दल बँड कला विकास प्रतिष्ठानने पुनीत बालन यांचा सत्कार केला.  पुण्याच्या वैभवशाली परंपरेला गालबोट लागू नये म्हणून घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे. पुढील पिढ्यांना शुद्ध परंपरा पोहोचवण्याचे हे मोठे पाऊल असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

पुण्याचा गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. त्याचे पावित्र्य, त्याची संस्कृती, त्याचे वैभव यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. परंतु ही जबाबदारी काही जणांनी गोंगाटाने कलंकित केली होती. त्यांना आळा घालण्यासाठी पुनित बालन यांनी पुढाकार घेतला आहे. 

पुनीत बालन यांनी घेतलेला निर्णय हा केवळ 2025 च्या गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही. यामुळे एक नवा पायंडा पडला आहे. डीजेमुक्त गणेशोत्सवाचे मॉडेल पुण्यात यशस्वी झाले, तर इतर शहरांनाही तो आदर्श ठरेल. महाराष्ट्रभरात आणि पुढे देशभरात डीजेमुक्त उत्सवांची संकल्पना रुजेल, हीच अपेक्षा .

Web Title: Ganesh Mahotsav: Historic step for DJ-free Ganeshotsav in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.