पुण्यात जिवंत देखाव्यांची गणेशभक्तांना भुरळ; ऐतिहासिक आणि पौराणिक प्रसंगांचे पुनरुज्जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 21:09 IST2025-08-30T21:04:47+5:302025-08-30T21:09:00+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका’, ‘छत्रपती संभाजी महाराज - इतिहासाचा तेजस्वी सूर्य’, ‘पावनखिंडीतील थरार’, ‘चापेकर बंधूंचा रँडवध’ असे ऐतिहासिक देखावे

पुण्यात जिवंत देखाव्यांची गणेशभक्तांना भुरळ; ऐतिहासिक आणि पौराणिक प्रसंगांचे पुनरुज्जीवन
पुणे: पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव जिवंत देखाव्यांनी सजला असून, पेठांमधील मंडळे यंदाही ऐतिहासिक आणि पौराणिक प्रसंगांचे भव्य सादरीकरण करून भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका’, ‘छत्रपती संभाजी महाराज - इतिहासाचा तेजस्वी सूर्य’, ‘पावनखिंडीतील थरार’, ‘चाफेकर बंधूंचा रँडवध’ असे ऐतिहासिक देखावे तर ‘हनुमान-कुंभकर्ण युद्ध’ आणि ‘संत ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत व दिलेला उपदेश’ असे पौराणिक प्रसंग भाविकांसमोर जिवंत झाले आहेत. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शुक्रवार पेठेतील मंडळांची परंपरा यंदाही कायम असून, बहुतांश मंडळांनी जिवंत देखावे सादर करण्यावर भर दिला आहे. यामुळे वातावरणात अधिक उत्साह संचारला आहे.
गणेशोत्सवाच्या पहिल्या टप्प्यात दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन पार पडल्यानंतर गौरी गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी शनिवार, दिनांक २९ रोजी शहराच्या मध्यवर्ती भागातील मंडळांकडे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली., शनिपार मंडळाचा ‘पाण्याखालील द्वारका’ हा देखावा नागरिकांमध्ये प्रचंड आकर्षण ठरत आहे. ऐतिहासिक वारसा, पौराणिक प्रेरणा आणि सामाजिक संदेशांचा संगम असलेले हे देखावे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरत असून, भाविकांना नवचैतन्य देत आहेत.
नारायण पेठेतील मुंजोबा बाल तरुण मित्रमंडळाने साकारलेला ज्ञानेश्वर महाराज व चांगदेव महाराज भेटीचा ऐतिहासिक देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. कुंजीर तालीम उंबऱ्या गणपती मित्रमंडळाने शिवाजी महाराजांचे पन्हाळ्यावरून सुटका हा जिवंत देखावा सादर केला आहे. शनिवार पेठ येथील बालविकास मित्रमंडळ ट्रस्ट यांनी तेलंगणा येथील स्वर्णगिरी व्यंकटेश्वरा स्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे, ती पाहण्यासाठी तरुणांची गर्दी होत आहे. शनिवार पेठ येथील जय हिंद मित्रमंडळाने श्री आदिमाया आदिशक्ती साडेतीन शक्तिपीठांचा देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी विशेषत: महिला भाविकांची मोठी गर्दी होत आहे.