खळबळजनक! दौंडमध्ये हॉटेल व्यावसायिकाची रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 16:52 IST2021-01-02T16:33:02+5:302021-01-02T16:52:44+5:30
या घटनेने श्रीगोंदा आणि दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

खळबळजनक! दौंडमध्ये हॉटेल व्यावसायिकाची रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या
दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये हॉटेल व्यावसायिकाने रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव दादा लक्ष्मण नलगे असे आहे. दौंड पोलीस ठाण्याशेजारील तारामती इमारतीमध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी गोळी झाडत आपली जीवन यात्रा संपवली आहे. पोलिसांनी आजारपणामुळे त्यांनी हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे यांचा मुलगा असलेल्या दादा नलगे यांनी दौंड येथील राहत्या घरी स्वतःच्या रिव्हॉलरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार बबनराव पाचपुते यांचे निकटवर्तीय म्हणून देखील नलगे कुटुंबाची ओळख आहे. दादा नलगे यांच्यामागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहीण, वहिनी असा परिवार आहे. या घटनेने श्रीगोंदा आणि दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलीस ठाण्यात दादा नलगे यांच्या आत्महत्येची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. तसेच नलगे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.