प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह करा सहकुटुंब अथर्वशीर्षपठण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 22:05 IST2020-08-28T22:03:32+5:302020-08-28T22:05:27+5:30
लोकमत ‘ती'चा गणपती’ उपक्रम- प्रसिद्ध गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्यासमवेत अथर्वशीर्ष पठणाची संधी मिळणार आहे..

प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह करा सहकुटुंब अथर्वशीर्षपठण
पुणे : ‘लोकमत’च्या वतीने कोरोनाविरुद्धच्या लढाईत मनाला उमेद देण्यासाठी प्रसिद्ध गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्यासोबत सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा अनोखा कार्यक्रम आयोजित
करण्यात आला आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता लोकमत फेसबुक पेजवर यामध्ये सहभागी होता येणार आहे.
लोकमत ‘ती'चा गणपती’ उपक्रमांतर्गत प्रसिद्ध गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्यासमवेत अथर्वशीर्ष पठणाची संधी मिळणार आहे. सामूहिक अथर्वशीर्ष पठणातून समूहशक्तीचा अनोखा जागर केला जाणार आहे. रोझरी फाऊंडेशन, कॅलीक्स ग्रुप आॅफ कंपनीज आणि काका हलवाई स्वीट सेंटर यांच्या सहयोगाने हा उपक्रम होणार आहे.
‘‘गणेशोत्सव काळात घराघरात श्रीगणरायाचे आगमन झाल्यानंतर अथर्वशीर्षाच्या तीन, सात, अकरा आणि एकवीस आवर्तनांतून गजाननाला वंदन केले जाते. तूच प्रत्यक्ष आदितत्त्व आहेस, तूच केवळ (सर्व जगाचा) निर्माता आहेस. तूच केवळ धारण करणारा आहेस. तूच केवळ संहार करणारा आहेस. तूच खरोखर सर्व जगाचा संहारक आहेस... तूच खरंतर सर्व ब्रह्म आहेस, तू प्रत्यक्ष आत्मतत्त्व आहेस... असे अथर्वशीर्षाचे संपूर्ण सार आहे. आधी गणेशाची स्तुती मग ध्यान अशी या स्तोत्राची रचना आहे.
‘लोकमत’ने महिलाशक्तीला सन्मान देण्यासाठी ‘ती’चा गणपती हा उपक्रम सुरू केला आहे. पौरोहित्यापासून ते आरतीपर्यंत सर्व विधी महिलांच्या हस्ते केले जातात. हाच समूहशक्तीचा जागर अथर्वशीर्ष पठणाने होणार आहे.
प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुरेल आवाजासोबत अथर्वशीर्षाचे पठण करताना आपल्या मनात उत्साह आणि उल्हासाची कंपने निर्माण होतील. त्यातून कोणत्याही संकटाविरुद्ध लढण्याची शक्ती मिळेल.