लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, ती घरी चालते; सुप्रिया सुळेंचे जगतापांच्या राजीनाम्यावर भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 20:42 IST2025-12-24T20:37:36+5:302025-12-24T20:42:21+5:30
पुण्याच्या हितासाठी चर्चा होत असेल तर, त्यामध्ये गैर काय? सगळ्या कार्यकर्त्यांचे मत विचारात घेऊनच पक्ष निर्णय घेईल

लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, ती घरी चालते; सुप्रिया सुळेंचे जगतापांच्या राजीनाम्यावर भाष्य
पुणे : पुण्याच्या विकासासाठी एकत्र येऊन निवडणूक लढली पाहिजे, त्याबाबत पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाला बरोबर घेऊन महापालिका निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, नाराजी घरी चालते, असे सांगून त्यांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे नाराजीनाट्य धुडकावून लावले.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पुण्यात पाणी, कचरा, वाहतूक कोंडी, वायू-जल प्रदूषणासारखे प्रश्न गंभीर आहेत. पुण्यात चांगला बदल हवा असेल, तर महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन महापालिका निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यादृष्टीने राष्ट्रवादी, उद्धवसेना, मनसे व काँग्रेस यांच्यासमवेत आमची चर्चा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सुळे पुढे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी माझी भेट झालेली नाही. मात्र, स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. मी कोणालाही भेटायला तयार आहे. सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलूनच मी अजित पवार यांच्याशी बोलणार आहे. पूर्ण शंका-निरसन होत नाही, तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. सर्व जबाबदारी माझी आहे.
लोकशाहीत नाराजी चालत नाही, ती घरी चालते...
लोकशाहीत नाराजी चालत नाही, नाराजी घरी चालते. प्रशांत जगताप यांना मुंबईत मागील दोन दिवस चार ते सहा तास देऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी मांडलेले प्रश्न रास्त आहेत. चर्चेतून मार्ग निघतो. पुण्याच्या हितासाठी चर्चा होत असेल तर, त्यामध्ये गैर काय? सगळ्या कार्यकर्त्यांचे मत विचारात घेऊनच पक्ष निर्णय घेईल. माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी निवडणूक लढावी, अशी माझी इच्छा होती. घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याबाबतची चर्चा माझ्या कानावर आलेली नाही, असे सुप्रिया सुळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
‘मन की बात’ जाणून घेतली, अंतिम निर्णय शरद पवार घेणार
पुणे महापालिका निवडणुकीबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. कार्यकर्त्यांची ‘मन की बात’ जाणून घेतली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.