पुण्याच्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट; पालिका तयार करणार आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 09:49 PM2020-07-08T21:49:45+5:302020-07-08T21:52:49+5:30

गणेश प्रतिष्ठापना आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्याकरिता यंदा पालिकेला आणि पोलिसांनाही विशेष कष्ट घ्यावे लागणार

Corporation to prepare plan for Ganeshotsav due to corona | पुण्याच्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट; पालिका तयार करणार आराखडा

पुण्याच्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट; पालिका तयार करणार आराखडा

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य शासनाच्या निर्देशांची प्रतिक्षा : वरिष्ठ अधिकाऱ्यांची होणार बैठकपुण्यात जवळपास तीन ते साडेतीन हजार गणेश मंडळे आहेत.

पुणे : जगभरात प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. गणेश मंडळांनीही यंदा साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी पालिका आराखडा तयार करणार असून याबाबत लवकरच आयुक्तांसह वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेतली जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.

पुण्यात जवळपास तीन ते साडेतीन हजार गणेश मंडळे आहेत. यासोबतच दरवर्षी दहा लाखांच्यावर नागरिकांच्या घरामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. दरवर्षी गणेश मुर्त्यांच्या विक्रीकरिता शहरात मोठ्या प्रमाणावर स्टॉल्स उभारले जातात. या स्टॉल्सना पालिकेकडून परवानगी दिली जाते. यासोबतच हार-फुले,  विविध वस्तू, सजावटीच्या वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्सही मोठ्या प्रमाणावर उभारले जातात. गणेश मुर्त्यांच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असतात. तसेच विसर्जनासाठीही गर्दी होत असते. यावर्षी कोरोनाची साथ असल्याने नागरिकांना एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. यासोबतच मास्क घालणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.
       

एकंदरीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता गणेश प्रतिष्ठापना आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्याकरिता यंदा पालिकेला आणि पोलिसांनाही विशेष कष्ट घ्यावे लागणार आहेत. उत्सवाच्या काळात गर्दीमधून कोरोनाचा संसर्ग फैलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी विशेष खबरदारी बाळगावी लागणार आहे. गणेशोत्सवानंतर  लगेच नवरात्र उत्सव येतो. त्यानंतर दसरा-दिवाळी असा सणांचाच कालावधी असल्याने प्रशासनाला विशेष नियोजन करावे लागणार आहे. पालिकेकडून गणेशोत्सवासंबंधी आराखडा तयार करुन  तो आयुक्तांना सादर केला जाणार आहे.  याविषयी लवकरच आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. यासोबतच राज्य शासनाकडूनही गणेशोत्सवासंबंधी निर्देश जारी केले जाण्याची शक्यता असून हे निर्देश पालिकेला प्राप्त झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 

Web Title: Corporation to prepare plan for Ganeshotsav due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.