पुढच्या वर्षी लवकर या...! पुण्यात सातव्या दिवशी १ लाख ३२ गणेशमूर्तींचे विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 11:24 IST2025-09-04T11:23:45+5:302025-09-04T11:24:04+5:30
यंदा गणेशमूर्ती संकलनासाठी शहराच्या विविध भागांत २४१ मूर्तिदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत

पुढच्या वर्षी लवकर या...! पुण्यात सातव्या दिवशी १ लाख ३२ गणेशमूर्तींचे विसर्जन
पुणे : गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजे गौरी विसर्जनाच्या दिवसी शहरात १ लाख ३२ हजार ७२८ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले असून, आतापर्यंत सात दिवसांमध्ये १ लाख ८५ हजार ५३० गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आहे. या काळात २ लाख १९ हजार २१२ किलो निर्माल्य संकलित झाले आहे.
महापालिका प्रशासनाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो. तसेच पुणेकरांनी नदी किंवा जलस्त्रोतांमध्ये गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन न करता पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करावे, यासाठी व्यवस्थाही केली जाते. या दृष्टीने महापालिकेने शहरात विसर्जनासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ३८ कृत्रिम हौद, एकूण २८१ ठिकाणी ठेवलेल्या ६४८ लोखंडी टाक्यांमध्ये व्यवस्था केली आहे. तसेच ३३८ ठिकाणी निर्माल्य कलश-कंटेनर ठेवण्यात आले आहेत. गणेशमूर्ती संकलनासाठी शहराच्या विविध भागांत २४१ मूर्तिदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. गौरी विसर्जनाच्या दिवशी म्हणजे मंगळवारी दिवसभरात शहरात १ लाख ३२ हजार ७२८ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आतापर्यंत सात दिवसांमध्ये १ लाख ८५ हजार ५३० गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आहे. यामध्ये बांधलेल्या हौदांमध्ये २५ हजार २०९, लोखंडी हौदांमध्ये १ लाख १५ हजार १३९ तर मूर्ती संकलन केंद्रात ४५ हजार १८२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. या काळात २ लाख १९ हजार २१२ किलो निर्माल्य संकलित झाले आहे.