मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; टीडीआर प्रकरणाला दिलेली स्थगिती कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:00 IST2025-10-30T10:00:46+5:302025-10-30T10:00:56+5:30
जनता वसाहत झोपडपट्टी पुर्नवसन योजनेच्या नावाखाली ७६३ कोटींच्या लॅण्ड टीडीआर लाटण्याचा प्रकार आहे

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; टीडीआर प्रकरणाला दिलेली स्थगिती कायम
पुणे : जनता वसाहत झोपडपट्टी पुर्नवसन योजनेच्या नावाखाली ७६३ कोटींच्या लॅण्ड टीडीआर लाटण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
पर्वती येथील फायनल प्लॉट क्र. ५१९, ५२१ अ, ५२१ ब, (जुना स. नं. १०५, १०७, १०८, १०९) ही ४८ एकर जागा पर्वती लॅण्ड डेव्हलपर्स एलएलपी यांच्या मालकीची आहे. जनता वसाहतीमधील या जागेवर जवळपास ३ हजार झोपड्या आहेत. झोपडपट्टीची खासगी जागा २०२२ च्या नियमावलीनुसार एसआरएने ताब्यात घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार जागा मालकांना टीडीआर स्वरूपात जागेचा मोबदला देण्याच्या प्रस्तावास गृहनिर्माण विभागाने मंजुरीही दिली होती. मात्र, हा प्रस्ताव मंजूर करताना त्यात मोठी अनियमिता झाल्याचे माध्यमांनी उजेडात आणल्यानंतर पर्वती मतदारसंघाच्या स्थानिक आमदार व नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी जनता वसाहत टीडीआर प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
त्यानंतर मिसाळ यांनी बुधवारी पुणे दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना या संपूर्ण घोट्याळ्याची माहिती देत चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या टीडीआरला दिलेली स्थगिती कायम ठेवत चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या गृह निर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असिम गुप्ता यांना दिल्याची माहिती मिसाळ यांनी दिली.