छत्रपती शिवाजी महाराज, लाेकमान्य टिळक, देवी आदिशक्ती; रथातून देव-देवतांच्या देखाव्यांसह मांडली शेतकऱ्यांची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 15:50 IST2025-09-08T15:48:50+5:302025-09-08T15:50:22+5:30
भगवान शंकर, विठ्ठल-रखुमाई, कृष्ण-राधा, त्रिमूर्ती दत्ता, श्रीराम, देवी आदिशक्ती, तिरुपती बालाजी आदी देव-देवतांसह सकल संत आणि गजानन महाराज यांचा देखावा, छत्रपती शिवाजी महाराज, लाेकमान्य टिळक, शेतकरी व्यथा, महिला सुरक्षा, ऑपरेशन सिंदूरसारखे राष्ट्रभक्तीपर देखावे सादर करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज, लाेकमान्य टिळक, देवी आदिशक्ती; रथातून देव-देवतांच्या देखाव्यांसह मांडली शेतकऱ्यांची व्यथा
पुणे : गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, ‘जय श्री राम’च्या घोषणा... ढाेल-ताशांचा गजर... डीजेचा दणदणाट.. डाेळे दीपवून टाकणारी राेषणाई यांसह यंदाच्या देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधले. गणरायाचे विविध रूप, भगवान शंकर, विठ्ठल-रखुमाई, कृष्ण-राधा, त्रिमूर्ती दत्ता, श्रीराम-लक्ष्मण-सीता-हनुमान, देवी आदिशक्ती, तिरुपती बालाजी आदी देव-देवतांसह सकल संत आणि गजानन महाराज यांचा देखावा, छत्रपती शिवाजी महाराज, लाेकमान्य टिळक यांच्या कार्याचा देखावा, याचबरोबर शेतकरी व्यथा, महिला सुरक्षा आदी सामाजिक प्रश्न आणि ऑपरेशन सिंदूरसारखे राष्ट्रभक्तीपर देखावे सादर करण्यात आले.
मानाच्या पहिल्या गणपतीसमोर मिरवणुकीत बालशिवाजी उभा हाेता. श्री जयंती गजानन रथात जिजाऊ-शिवबा यांचा देखावा साकारला आणि पोवाडा सादर केला जात हाेता. दादोजी कोंडदेव सोन्याचा नांगर घेऊन होते. तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या मिरवणुकीत वराह अवताराचा जिवंत देखावा, हत्तीवर विराजमान शिवरायांचा देखावा हाेता. तसेच अफजल खान वधाचा, ब्रह्म-विष्णू-महेश यांचा जिवंत देखावा हाेता. फुलांनी सजवलेल्या मयूर रथात तुळशीबाग गणपती बाप्पा विराजमान हाेता आणि रथावर राधा कृष्ण झाेका घेत हाेते. केसरी वाडा गणपतीसमोर लोकमान्य टिळक यांचा जिवंत देखावा सादर केला जात होता. पोटसुळ्या मारुती मंडळ, गवळी आळी होनाजी तरुण मंडळाने शिवरायांचा जिवंत देखावा सादर केला. केळकर रस्त्यावरून आलेल्या एका मंडळाने ऑपरेशन सिंदूर हा देखावा सादर केला. भोईराज मंडळाने माँ वैष्णोदेवी रथ सादर केले.
हुतात्मा भगतसिंग मित्र मंडळाचा विठ्ठल-रखुमाई देखावा, सूर्योदय मित्र मंडळ कबड्डी संघाचा तिरुपती बालाजी देखावा सादर केला. आणि सोमवार पेठ खडीचे मैदान मंडळ ट्रस्टने सादर केलेला शेतकरी देखावा लक्षवेधी ठरला. ‘बाप्पा शेतमालाला भाव मिळो, शेतकरी राजा आनंदी होवो’ असे फलक झळकवण्यात आले. रवींद्र नाईक चौक मित्र मंडळाने राधाकृष्ण देखावा मांडला. अभय मित्र मंडळानेही ऑपरेशन सिंदूर देखावा साकारला हाेता. आदर्श सेवा मंडळाने त्रिमूर्ती दत्त देखावा, तर योजना युवक मित्र मंडळाने शंकराचा, तर गजानन मित्र मंडळाने विठ्ठल-रखुमाई देखावा सादर केला हाेता. कर्मवीर तरुण मंडळाचा विठ्ठलाचा देखावा, शिंदे आळी सार्वजनिक गणेश मंडळाचा त्रिमूर्ती देखावा, तर हरका नगर तरुण मंडळाने माहेश्वरी रथ सादर करून लक्ष वेधले.