PMC Election 2026: प्रभागातील नाराज कार्यकर्त्यांमुळे उमेदवारांना धास्ती; क्राॅस व्होटिंगचा फटका भाजपला बसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:16 IST2026-01-08T09:15:42+5:302026-01-08T09:16:33+5:30
पुणे महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. या पालिकेेच्या सभागृहाची मुदत २०२२ मध्ये संपली. त्यानंतर पुणे महापालिकेेवर साडेतीन वर्षे प्रशासक राज होते.

PMC Election 2026: प्रभागातील नाराज कार्यकर्त्यांमुळे उमेदवारांना धास्ती; क्राॅस व्होटिंगचा फटका भाजपला बसणार
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी केवळ सहा दिवस उरले आहेत. मात्र, भाजपसह सर्वच पक्षांतील नाराज कार्यकर्ते अद्यापही प्रचारात उतरलेले नाहीत. त्यातच उमेदवारी डावलेल्या काही नाराजांनी निवडक कार्यकर्तेबरोबर घेऊन अनेक प्रभागांमध्ये क्राॅस व्होटिंगसाठी मोर्चबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे उमेदवारांनी क्रॉस व्होटिंगची धास्ती घेतली आहे. काही राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. या पालिकेेच्या सभागृहाची मुदत २०२२ मध्ये संपली. त्यानंतर पुणे महापालिकेेवर साडेतीन वर्षे प्रशासक राज होते. आता पालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यकर्ते इच्छुक होते, तर अनेक माजी नगरसेवकांनी प्रभागातील इतर सक्षम कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणुकीची तयारी केली होती. पण, भाजपने ४० माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुकांना उमेदवारी दिली नाही. त्यात इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या सुमारे दोन डझन जणांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराजांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढत असले तरी १० जागांवर घड्याळ आणि तुतारीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. तर काँग्रेस, उध्दवसेना आणि मनसेे एकत्रपणे महाआघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये नाराज कार्यकर्त्यांची फळी आहे. अशा नाराज कार्यकर्त्यांना हेरण्याचे काम विरोधी पक्षातील जाणकार करत आहेत. विशेषकरून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या समोरच्या प्रभागातील माजी नगरसेवकांना साकडे घातले जात आहे. ज्या प्रभागात आपल्याला जास्त मते मिळतील, तिथे तुम्हाला चालवतो. तुमच्या प्रभागात अंतर्गत यंत्रणेद्वारे आम्हाला चालवा, असे निरोप देण्याचे काम सुरू आहे.
क्राॅस व्होटिंगचा फटका भाजपला बसणार
पुणे महापालिकेच्या २०१२च्या निवडणुकीत दोन सदस्यीय पध्दतीमध्ये २० ठिकाणी क्रॉस व्होटिंग झाले होते. पालिकेच्या २०१७ मध्ये चार सदस्यांचा प्रभागामध्ये १० ठिकाणी क्राॅस व्होटिंग झाले होते. त्यामुळे त्यात भाजप-राष्ट्रवादी, शिवसेना-राष्ट्रवादी असे उमेदवार निवडून आले होते. या सर्व बाबींचा विचार करून निवडणुकीत काही जाणकारांनी क्रॉस व्होटिंगच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या क्राॅस व्होटिंगचा फटका भाजपला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.