अखेर तिढा सुटला! पुणे आणि पिंपरी महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:09 IST2025-12-29T12:08:00+5:302025-12-29T12:09:49+5:30
पिंपरीची जबाबदारी अमोल कोल्हे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर माझ्याकडे पुण्याची जबाबदारी आहे

अखेर तिढा सुटला! पुणे आणि पिंपरी महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांची घोषणा
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन्ही राष्ट्रवादीच्या जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने चर्चा फिस्कटली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी हे महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावत होते. मात्र, महाविकास आघाडीच्या बैठकीला अचानकपणे राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या पक्षातील कोणताही पदाधिकारी उपस्थित राहिले नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेपाठोपाठ पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) दोन्ही एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरला असून दोन्ही पक्षाच्या आघाडीची घोषणा आज होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत पुणे आणि पिंपरी दोन्हीकडे एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे.
रोहित पवार म्हणाले, कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार आपल्याला घड्याळासोबत जाणं योग्य राहणार आहे. आम्ही तुतारीवर निवडणूक लढवणार आहोत. दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही पालिकेत एकत्र लढणार आहेत. कार्यकर्त्यांसाठी एकत्र निवडणूक लढवणार आहोत. सर्वत्र वेगवेगळे समीकरण आहेत. उद्या तुतारी आणि घड्याळाकडून एबी फॉर्म वाटले जाणार असून त्यानंतर कुणाला किती जागा मिळणार हे तेव्हा कळणार आहे. कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने तो निर्णय आम्ही अखेर घेतला आहे. पुणे महापालिकेत ज्यांची सत्ता होती त्यांनी कामं केली नाहीत. आता पिंपरीची जबाबदारी अमोल कोल्हे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर माझ्याकडे पुण्याची जबाबदारी आहे. प्रशांत जगताप चांगले कार्यकर्ते होते. मात्र त्यांनी असा निर्णय का घेतला हे माहिती नाही.
दरम्यान पुणे महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाबाबतच्या महाविकास आघाडीच्या नियोजित बैठकीला राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे कोणीही पदाधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्याबाबत उद्धवसेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली. त्यावर ‘कोणाचीही वाट पाहू नका, पुढे जा,’ असा सल्ला वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे.