खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमध्ये आढळले दोन मृतदेह; 2 दिवसांपासून होते घरातून गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 15:34 IST2022-04-02T15:27:23+5:302022-04-02T15:34:19+5:30
बुडून मृत्यू झाल्याच्या प्राथमिक अंदाज, परिसरात भीतीचे वातावरण...

खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमध्ये आढळले दोन मृतदेह; 2 दिवसांपासून होते घरातून गायब
शिवणे (पुणे) : खडकवासला धरणाच्या (khadakwasla dam) मागच्या बाजूला असलेल्या मोर्यांजवळील डोहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कपडे, गोधड्या धुण्यासाठी नेहमीच लोक येथे येत असतात. अशामध्ये तरुणांचा बुडून मृत्यू झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोहायला आलेल्या काही जणांना पाण्यात मृत व्यक्तीचे शरीर तरंगताना दिसले ते पाहून त्यांनी खडकवासला धरणाच्या सुरक्षा रक्षकांना कळवले.
सुरक्षा रक्षकाने उत्तमनगर पोलिसांना कळवताच उत्तमनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवान तेथे दाखल झाले. त्यांनी दोन्ही जणांना पाण्यातून बाहेर काढले. विजय नागनाथ रोकडे (वय २३ रा.रामनगर माळवाडी) आणि रॉबिन कुबेर वाघमारे (वय २३ बराटे चाळ माळवाडी) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार विजय आणि त्याचा मित्र रॉबिन हे दोन दिवसांपासून घरातून गेले होते. शनिवारी सकाळी काही जणांना कोणीतरी पाण्यात तरंगत असलेले दिसले असता त्यांनी सुरक्षा रक्षकांना सांगितले. खडकातील डोहात पोहताना पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. बाजूलाच खडकावर दोघांचे कपडे आणि वस्तू आढळून आल्या आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशामक केंद्राचे अधिकारी सुजित पाटील वाहनचालक अभिषेक गोणे, ओंकार इंगवले, फायरमन पंकज माळी, किशोर काळभोर, योगेश मायनाळे, अक्षय काळे, शुभम मिरगुंडे, शुभम माळी यांनी दोघांना पाण्याबाहेर काढले.
सदर घटनेची माहिती उत्तमनगर पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, पोलीस हवालदार पंढरीनाथ कोळेकर, पोलीस कॉन्स्टेबल चेतन बराटे, गजानन चव्हाण तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.