Pune Mayor : भाजपचा मास्टरस्ट्रोक..! पुणे महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे, उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर अर्ज भरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:02 IST2026-02-03T13:01:47+5:302026-02-03T13:02:11+5:30
येत्या ९ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत नागपुरे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

Pune Mayor : भाजपचा मास्टरस्ट्रोक..! पुणे महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे, उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर अर्ज भरणार
पुणे : पुणे महापालिकेच्या महापौरपदाच्या शर्यतीत अखेर मंजुषा नागपुरे यांचे नाव आघाडीवर आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तर उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे येत्या ९ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत नागपुरे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
महापौर आणि उपमहापौर पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत असून महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने दोन्ही पदांवर त्यांचाच दावा जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर होणे ही केवळ औपचारिकता उरली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
अलीकडे झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने १६५ पैकी तब्बल ११९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव असल्याने अनुभवी महिला नगरसेवकांना संधी देण्याच्या हालचाली पक्षात सुरू आहेत.
या पदासाठी वर्षा तापकीर, रंजना टिळेकर, स्मिता वस्ते आणि मानसी देशपांडे यांची नावे चर्चेत होती. तसेच उज्ज्वला जंगले, मनीषा चोरबोले आणि माजी मंत्री दिवंगत गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांच्याही नावाचा विचार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अनुभवी आणि संघटनात्मक कामाचा ठसा उमटवलेल्या मंजुषा नागपुरे यांना प्राधान्य दिल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीत तीन महिलांना प्रत्येकी दहा महिन्यांसाठी महापौरपद देण्याचा ‘रोटेशन फॉर्म्युला’ वापरण्याचाही पर्याय पक्ष पातळीवर चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार की नाही यावर उशिरापर्यंत चर्चा सुरू होती, तर काँग्रेसकडून दोन्ही पदांसाठी उमेदवार उतरवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.