कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने सोमवारी अर्ज दाखल करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 17:46 IST2023-02-05T17:46:39+5:302023-02-05T17:46:48+5:30
हेमंत रासने हे उद्या सकाळी साडेनऊ वाजता ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरचे दर्शन घेऊन अर्ज भरण्यासाठी जाणार

कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने सोमवारी अर्ज दाखल करणार
पुणे : भारतीय जनता पक्षाने पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय पक्ष कार्यालयातून दोन्ही नावांची घोषणा झाली असून चिंचवड मतदारसंघासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे. तर, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे, आता येथील मतदारसंघात निवडणुकांचा धुरळा उडणार हे निश्चित झालं आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप, बाळासाहेंबाची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम पक्ष महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे सोमवारी ( दि. ६) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंदकांत पाटील, बाळासाहेंबाची शिवसेनेेचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हेमंत रासने हे उद्या सकाळी साडेनऊ वाजता ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरचे दर्शन घेऊन अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.