पुण्यात मोठी राजकीय घडामोड; दोन्ही राष्ट्रवादी २५ किंवा २६ तारखेला एकत्र येणार, नेत्यांच्या बैठका सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 13:27 IST2025-12-23T13:26:03+5:302025-12-23T13:27:38+5:30
काही वेळापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाली आहे

पुण्यात मोठी राजकीय घडामोड; दोन्ही राष्ट्रवादी २५ किंवा २६ तारखेला एकत्र येणार, नेत्यांच्या बैठका सुरु
पुणे: पुणे महानगपालिका निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. लवकरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची चिन्हे दिसू लागली आहेत. दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा दावा काल माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी केला होता. आज अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याबाबत ठरवलं असल्याचे सांगितलं आहे.
जगताप म्हणाले, रात्री दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याबाबत ठरवलं आहे. जागा वाटपासाठी दोन दोन पावलं आम्ही मागे घेणार आहोत. २५ किंवा २६ तारखेला दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर होणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
दरम्यान आताच मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवार गटाचे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सगळे स्थानिक नेते पोहोचले आहेत. शहराध्यक्ष सुभाष जगताप, दीपक मानकर, अण्णा बनसोडे, आमदार चेतन तुपे, प्रदीप देशमुख, सुनील टिंगरे हे सगळे अजित पवार यांच्या दालनात आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर आणि काँग्रेससोबत जाणार का ? याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. काही वेळापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाली आहे. त्या बैठकी नंतर सगळे आता अजित पवारांना माहिती देण्यासाठी गेले असल्याची माहिती आहे. शरद पवार गटाचे वंदना चव्हाण, अंकुश काकडे, विशाल तांबे यांच्यासोबत गुप्त बैठक झाली आहे.
प्रशांत जगताप यांचा राजीनामा
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप राजीनाम्याच्या तयारीत आहेत. त्यांनी पक्षासमोर प्रस्ताव ठेवला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होणार असतील तर पक्ष सोडणार असल्याची भूमिका जगताप यांनी घेतली आहे. जगताप आता राष्ट्रवादीतून बाहेर पाडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत प्रशांत जगताप निर्णय जाहीर करणार असल्याचे कळते आहे.