बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 08:28 IST2026-04-06T08:23:00+5:302026-04-06T08:28:36+5:30
काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवारी दिल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.

बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
Baramati byelection 2026: राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता नाट्यमय वळण आले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिलेल्या काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली असून, उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुती सरकारसमोर एक अट ठेवली आहे. राज्य सरकारने जर दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल केला, तरच मी माझी उमेदवारी मागे घेण्याचा पुनर्विचार करेन, अशी घोषणा काँग्रेसचे उमेदवार अॅड. आकाश मोरे यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुनेत्रा पवार यांनी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, काँग्रेसने शेवटच्या क्षणी माजी खासदार विजय मोरे यांचे पुत्र आणि अनुभवी कार्यकर्ते आकाश मोरे यांना मैदानात उतरवले. माध्यमांशी बोलताना आकाश मोरे यांनी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला.
आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि भाजपच्या विचारधारेविरोधात ही लढाई लढत आहोत. अजित पवार यांचा झालेला अपघात हा केवळ योगायोग नसून, त्यातील सत्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सरकारने अद्याप याप्रकरणी ठोस कारवाई केलेली नाही. जर सरकार या घटनेवर गुन्हा नोंदवून तपास करणार असेल, तर आम्ही निवडणुकीतून माघार घेण्याबाबत पुनर्विचार करणार असल्याचे आकाश मोरे यांनी सांगितले.
"आम्ही उमेदवारी मागे घेण्याबाबत पुनर्विचार करु. तुम्ही या प्रकरणात गंभीर आहात का? बारामतीचा, महाराष्ट्राचा कर्ता पुरुष गेला आहे. या सगळ्या गोष्टी गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येतात. राज्यातील दुसऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू होत असेल तर याचा तुम्ही गांभीर्याने विचार करणार आहात की नाही. याच्यावर समर्पक उत्तर का देत नाहीत. विधानसभेत सांगता पण बाहेर येऊन तुम्ही कोणती माहिती दिली. सगळं अलबेल आहे. आम्ही अजितदादांना विरोध केला पण विकासाच्या बाबतीत आम्ही त्यांच्या सोबत होतो. अत्यंत कर्तबगार माणूस गेला आणि त्यांच्याबाबत काहीच घडत नाही. जर महाराष्ट्रात एफआयआर दाखल केला गेला तर आम्ही माझ्या उमेदवारीचा पुनर्विचार करु. प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांना मी याबाबत सांगितले तेव्हा त्यांनीही मला तसेच सांगितले, असेही आकाश मोरे म्हणाले.
दरम्यान, शरद पवार गटाने आणि उद्धवसेनेने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, असे वाटत होते. मात्र, काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार देऊन नवी राजकीय खेळी केली आहे. आकाश मोरे हे पेशाने वकील असून त्यांचे वडील माजी आमदार होते. २०१४ मध्ये त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. येत्या २३ एप्रिल रोजी बारामतीत मतदान होणार असून, ४ मे रोजी निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल.